आ. मंगेश चव्हाण यांच्या मागणीला यश : दूध भुकटी निर्यातीला ३० रु.प्रतिकिलो अनुदान
मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील दूध दर प्रश्नांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृहात राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली होती. यात जळगाव जिल्हा सहकारी दूध संघांचा प्रतिनिधी तसेच दूध दर समिती सदस्य आ. मंगेश चव्हाण यांनी गायीच्या दुधाला किमान ३० रुपये दर द्यावा तसेच ५ रुपये प्रति लिटर अनुदान तात्काळ लागू करावे तसेच दुध भुकटी निर्यातीला अनुदान द्यावे आदी दूध उत्पादकांच्या संदर्भातील विविध मागण्या केल्या होत्या. या मागणीला यश मिळाले आहे.
विधानसभेमध्ये राज्याचे दुग्धव्यवसाय मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील सर्व शासकीय व खाजगी दूध संघांना गायीच्या दुधाला किमान ३० रुपये खरेदी दर देणे बंधनकारक असल्याचे जाहीर केले आहे. तसेच १ जुलै पासून ५ रुपये प्रती लिटर अनुदान देखील दिला जाणार असल्याने एकूण ३५ रुपये प्रति लिटर किमान दर दूध उत्पादकांना मिळणार आहे. यासोबतच दूध भुकटी निर्यात करणाऱ्या संस्थांना ३० रुपये प्रति किलो मागे अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतल्याबद्दल आ. मंगेश चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, दुग्धव्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांचे आभार मानले आहेत.
दि.१ जुलै रोजी दूध दराबाबत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीला विधानसभेचे माजी अध्यक्ष आ.हरिभाऊ बागडे, माजीमंत्री सदा खोत, आमदार विनय कोरे, माजी आमदार शिवाजीराव कर्डीले, यांच्यासह पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे आयुक्त, वरीष्ठ अधिकारी, राज्यातील विविध दूध संघाचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. आ. मंगेश चव्हाण यांनी शासनाच्या निर्णयाचे स्वागत करतानाच मागील काळात डेटा व्हेरिफिकेशन न झाल्याने ५ रुपये अनुदानापासून बरेच दूध उत्पादक वंचित राहिले आहेत त्यांना मुदतवाढ देऊन ते अनुदान तात्काळ देण्यात यावे अशी मागणी देखील राज्य शासनाकडे केली आहे.