पाचोरा ( प्रतिनिधी ) – पाचोरा तालुक्यातील सावखेडा बु येथील जवान मंगलसिंग जयसिंग परदेशी नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत शनिवारी मध्यरात्री पठाणकोट (पंजाब) येथे शहिद झाले . त्यांच्या पार्थिवावर उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. सावखेडा बुद्रुक परिसरावर शोककळा पसरली आहे.
शनिवारी मध्यरात्री पठाणकोट (पंजाब) येथे कर्तव्यावर असतांना नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत मंगलसिंग परदेशी शहिद झाले आहे. ते शहीद झाल्याचे वृत्त सावखेड्यात धडकताच सावखेडा बु”, सावखेडा खु”, वरखेडी, डांभुर्णी, मोंढाळे ( ता. भुसावळ) सह परीसरावर शोककळा पसरली असून सावखेडा गावी घटनेची माहिती मिळताच मोठा जनसमुदाय लोटला होता. त्यांचे वृद्ध आई – वडील, दोन भावंडासह नातेवाईक व गावकऱ्यांनी आक्रोश केला. शहिद जवानाचे पार्थीव सोमवारी पठाणकोट येथून विमानाने औरंगाबाद येथे आल्यानंतर तेथुन लष्कराच्या वाहनातून गावी आणल्यानंतर सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहे.
पाचोरा शहरापासून १५ किलोमीटर अंतरावरच्या सावखेडा बु” येथील जवान मंगलसिंग जयसिंग परदेशी (वय – ३५) सन – २००५ मधे अलीबाग येथे भारतीय सैन्यात भरती झाल्यानंतर त्यांनी सिकंदराबाद येथे प्रशिक्षण घेतले होते. सन – २०१४ मधे त्याचा मोंढाळे ( ता. भुसावळ) येथील मुलीशी विवाह झाला त्यांना दोन मुली व एक मुलगा असे तीन आपत्य आहेत. पत्नी व कुटुंब मंगलसिंग यांच्या सोबतच राहत होते.