एमआयडीसी पोलीस स्टेशनची कामगिरी
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील मुकुंद नगर येथे अज्ञात चोरटयांनी चांदीच्या मुकुटासह दागिने असा मुद्देमाल चोरटयांनी चोरून नेला होता. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात एमआयडीसी पोलीस स्टेशनने कामगिरी करून २ संशयितांना अटक केली आहे.
शहरातील मुकुंद नगर लाठी शाळेच्या मागे मानेश्वर महादेव मंदिर असुन मंदिरातील महादेवाच्या पिंडास असलेले चांदीच्या मुकुटासह इतर दागिने हे मंदिरासमोर राहत असलेल्या अरुण लक्ष्मण शेटे यांचे घरी ठेवलेले असतात. सण उत्सव असेल तेंव्हा मंदिरात पिंडास लावले जातात, फिर्यादी अरुण शेटे हे कुटुंबासह पुणे येथे मुलाकडे गेले असता घरात ठेवलेले महादेव मंदिराचे ६१,५००/- रु.किं.चे चांदीच्या मुकुटासह दागिने कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेले म्हणुन एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता.
पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी त्यांचे गुन्हे शोध पथकातील पोउनि चंद्रकांत धनके, प्रदिप चौधरी, गिरीश पाटील, रतन गिते, गणेश ठाकरे, नितीन ठाकुर, राहुल घेटे यांचे पथक तयार करुन अज्ञात आरोपीतांचा शोध घेणे बाबत सुचना दिल्या. त्यानुसार पथकाने घटनास्थळा वरील तसेच येणा-या जाणा-या रस्त्याचे चौका चौकातील सीसीटीव्ही फुटेज चेक करीत सदर संशयित आरोपीतांचे चेहरे निष्पन्न केले. त्यानुसार त्यांना ताब्यात घेतले. यात शाकीब शेख ताजुद्दीन शेख (वय २४ रा. कासमवाडी, जळगांव), राहुल शेखर रावळकर (वय-३२ रा. जाखनी नगर, कंजरवाडा, जळगांव) यांना पोलीसांनी अटक केली आहे. गुन्हयात चोरी गेलेला मुददेमाल हस्तगत केला आहे.