मुंबई ( प्रतिनिधी ) – एकनाथराव खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसेंना मुंबई उच्च न्यायालयाने भोसरी जमीन गैरव्यवहार खटल्यात दिलासा दिला. अटक झाल्यास ५० हजारांच्या जामिनावर सुटका करण्याचे पोलिसांना आणि १७ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवारी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश त्यांना न्यायालयाने दिले . विशेष न्यायालयासमोर हजर राहण्यासंदर्भातील निर्देश न्यायालयाने मंदाकिनी यांना दिले आहेत.
पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा खटल्यात मंदाकिनी खडसे यांच्याविरोधात दोन दिवसांपूर्वीच मुंबई सत्र न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, सुनावणीदरम्यान त्यांचा अर्ज फेटाळून लावत त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिली होती. अंजली दमानिया यांनीच यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, एकनाथराव खडसे यांना मात्र वैद्यकीय कारणांमुळे दिलासा मिळाला असून त्यांच्याबाबत पुढील सुनावणी येत्या २१ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
एकनाथराव खडसे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतल्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागल्याचं त्यांच्या वकिलांनी न्यायालयासमोर सांगितलं होतं. त्यानंतर त्यांना २१ ऑक्टोबर रोजी हजर राहण्याची मूभा देण्यात आली.