भुसावळ तालुक्यात तापी नदीपात्रात घडली घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- भुसावळ शहरातील पेंढारवाडा परिसरात देवाच्या कार्यक्रमानिमित्त जालना येथून मामाभाचे आले होते. बुधवारी दि. २१ मे रोजी सकाळी ८ वाजता राहुल नगर भागातील तापी नदीपात्रात हे मामा भाचे दोघे अंघोळीसाठी गेले असताना त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडून मृत्युमुखी पडल्याची माहिती प्राप्त झाली आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरु होते.
रामराजे नंदलाल नातेकर (वय ५५) आणि आर्यन नितीन काळे (वय २१, दोन्ही रा. जालना) असे मयत मामा भाच्यांची नावे आहेत. रामराजे नातेकर यांच्या पश्चात पत्नी, २ मुले असा परिवार आहे. तर आर्यन काळे याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.(केसीएन)दोन्ही परिवार हातमजुरी करून उदरनिर्वाह करतात.दरम्यान, भुसावळ येथील मामाजी टॉकीज परिसरातील पेंढारवाडा भागात रहिवासी संदीप रणधीर यांच्याकडे देवाचा कार्यक्रम असल्याने ते जालना शहरातून भुसावळ येथे आले होते.
दरम्यान, बुधवारी दि. २१ रोजी सकाळी भुसावळ शहरातील राहुल नगर भागातील देवीच्या मंदिराच्या परिसरातील तापी नदीपात्रात रामराजे नातेकर हे भाचा आर्यन काळे याला घेऊन अंघोळीसाठी गेले होते.(केसीएन)दरम्यान, पात्रातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले. नागरिकांनी त्यांना भुसावळ ट्रॉमा सेंटर येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबियांनी आक्रोश केला. घटनेची भुसावळ शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.