अमळनेर शहरात फरशी पुलावरील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) :- शहरातील फरशी पुलावर दुचाकीला मागून येणाऱ्या मालवाहू ट्रकने जोरात धडक दिल्याने सेंट्रिंग कामासाठी जात असलेला मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील रहिवाशी असलेले सतीश भादू नन्नवरे व सागर किशोर खांडेकर हे दि. १३ जून रोजी ज्युपीटर कंपनीच्या मोटारसायकलने (एम एच १९ सी डब्लू ३३२१ ) धार ता. अमळनेर येथे सेंट्रिंग कामासाठी जात होते. धार येथे जातांना शहरातील फरशी पुलावर त्यांच्या मागून येणाऱ्या मालट्रक (एम एच २० डी इ २३८७) वरील चालकाने त्यांच्या मोटारसायकलला जोरात मागून धडक दिली. यात सतीश नन्नवरे यांच्या पायाला जबर दुखापत झाल्याने त्यांना जळगाव येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. सतीश नन्नवरे यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरून अज्ञात मालट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ गणेश पाटील करत आहेत.