एमआयडीसी पोलीस स्टेशनची कार्यवाही
जळगाव (प्रतिनिधी) – नाशिक जिल्ह्यातून मालेगाव तालुक्यातील लोणवाडे येथून दि. ११ डिसेंबर रोजी सुमारे ११ लाख रुपयांचे डंपर चोरी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी मालेगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा डंपर जळगाव शहरातील फातेमा नगरात आढळून आला आहे. हा डंपर एमआयडीसी पोलिसांनी मालेगाव तालुका पोलिसांना ताब्यात दिला आहे.
मालेगाव येथे डंपर चोरीचा गुन्हा दाखल असून गुन्ह्यातील फिर्यादी ऋषिकेश महारू मोरे यांचा मालकीचा ११ लाख रुपये किमतीचा डंपर (क्र एमएच १५ डीके- ९७५३) हा लोनवाडे येथून दि. ११ डिसेंबर रोजी चोरी गेला होता. सदर गुन्ह्यातील तपास अधिकारी यांनी पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना सदरचा डंपरचा शोध घेणे बाबत कळविले असता पोलिस निरीक्षक यांनी गुन्हे शोध पथकातील पोउपनि शरद बागल यांना सदर डंपरचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शरद बागल यांनी पोका विशाल कोळी, राहुल रगडे यांच्यासह सदर डंपरची सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या सहाय्यानं पाहणी करीत असता डंपर हा एमआयडीसी परिसरात गेल्याचे दिसून आले होते.
सतत दोन दिवस संपूर्ण परिसर शोधला असता चोरीस गेलेला डंपर हा फातिमा नगर परिसरात निर्जन स्थळी उभा असल्याचे दिसून आला. डंपर हा पंचनामा कारवाई करून ताब्यात घेत मालेगाव तालुका पोलिस स्टेशनशी संपर्क करून त्यांचा ताब्यात देण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप पाटील, पोउपनि शरद बागल , पोकॉ विशाल कोळी, राहुल रगडे, पोना योगेश बारी यांनी केली आहे.