जळगावच्या भोईटे नगर येथील घटना : शिरसोलीत शोककळा
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील भोईटे नगर येथील रेल्वेच्या मालधक्क्यावर काम करीत असताना २८ वर्षीय तरुणाच्या छातीत अचानक दुखायला लागले. सोबतच्या सहकाऱ्यांनी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. ऐन दिवाळीत घरातील तरुणाचा मृत्यू झाल्याने रुग्णालयात कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. जळगाव शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

निलेश सुभाष गायकवाड (वय २८, रा. चिंचपूरा चौक, शिरसोली ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो गावात आई, वडील, लहान भावासह राहत होता. पूर्ण परिवार हा मजुरी काम करून उदरनिर्वाह करीत आहे. निलेश हा जळगावातील भोईटे नगर परिसरातील रेल्वेच्या मालधक्क्यावर हमाली काम करून हातभार लावीत होता.(केसीएन)दरम्यान, बुधवारी दि. २२ ऑक्टोबर रोजी निलेश हा नेहमीप्रमाणे कामावर गेला होता. सकाळी काम करीत असताना साडे बारा वाजेच्या सुमारास अचानक त्याला छातीत दुखायला लागले.त्याची प्रकृती गंभीर झाली.
सोबतच्या सहकाऱ्यांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून त्यांनी मन हेलावणारा आक्रोश केला.घटनेमुळे शिरसोली गावात शोककळा पसरली असून जळगाव शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ऐन दिवाळी सणात तरुणाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.









