राकेशच्या भाऊ सोनूची माध्यमांकडे कैफियत
जळगाव (प्रतिनिधी) – स्मशानभूमीजवळ आम्हाला अडविले… पाच लोकांनी मला व सलमान भाऊला मारहाण केली. माझ्या हातावर चॉपरदेखील मारला… पण… मागच्या चारचाकी वाहनातून येणारा माझा भाऊ मला वाचवायला थांबला अन… मारेकऱ्यांनी तेथेच राकेशभाऊंवर वार केले… अशी कैफियत माजी महापौर अशोक सपकाळे यांचे चिरंजीव सोनू सपकाळे याने ‘केसरीराज’कडे बोलताना मांडली.
घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबचे पथक नमुने घेताना, सोबत सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे, पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे व पोलीस कर्मचारी.
शिवाजी नगर येथील माजी महापौर अशोक सपकाळे यांचे द्वितीय चिरंजीव राकेश सपकाळे यांचा बुधवारी रात्री ११.३० वाजता अज्ञात मारेकऱ्यांनी चॉपर, तलवार, लोखंडी रॉड वापरून निर्घृण खून केला. याबाबत सोनू सपकाळे याने सांगितले की, रात्री जेवणाचा डबा घ्यायला ड्रायव्हर सलमान शेख युसूफ सोबत घरी जात होतो. त्यावेळी विशाल संजय साळुंखे, रा. प्रजापतनगर व गणेश दंगल सोनवणे यांच्यासह ५ जणांनी वाहनाला साईड का दिली नाही या कारणावरून वाद घातला. त्यावेळी मी वाहन थांबवले नाही. नंतर त्यांनी माझ्या दुचाकीस लाथ मारून आम्हाला खाली पाडले. दुचाकीची तलवारीने तोडफोड केली. तसेच माझ्यावर चॉपरने वार केला. तो चुकविला असता उजव्या हातावर चॉपरचा वार कोपऱ्याला लागला. त्यानंतर ते पाचही जण आम्हाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत असताना मागून माझा भाऊ राकेश हा मित्रांसह आला. त्याने मला वाचवायला चारचाकी वाहनातून उतरला मात्र मारेकऱ्यांनी त्याच्या डोक्यावर, मांड्यांवर तलवार, चॉपर, लोखंडी दांडाने गंभीर वार केले. त्यात भावाचा मृत्यू झाला, असेहि सोनुने आपबिती कथन केली. आज दुपारी १२.३० वाजता राकेश सपकाळे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार शिवाजी नगर येथील वैकुंठधाम येथे करण्यात आले. अंत्यसंस्कारवेळी गर्दी जमल्याने काही वेळ शिवाजी नगर ते ममुराबाद रोड परिसरात वाहतूक ठप्प होती मात्र, पोलिसांनी त्वरित वाहतूक सुरळीत केली.