पारोळा (प्रतिनिधी) – पारोळा तालुक्यातील मेहूटेहू या गावात मृत माकडाच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावकऱ्यांनी एकत्र येत पारंपरिक विधीनुसार मूर्तीची स्थापना केली. नवग्रह पूजन, हवन, मंत्रोच्चार व प्राणप्रतिष्ठा अशा धार्मिक विधींच्या वातावरणात जवळपास पाच तास चाललेला हा सोहळा अत्यंत श्रद्धा व भक्तिभावाने पार पडला. शेखर जोशी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहकाऱ्यांच्या मंत्रोच्चारात प्राणप्रतिष्ठेची विधीवत अंमलबजावणी करण्यात आली.
ग्रामस्थांनी मारुतीरूपी माकडाच्या मूर्तीसमोर गावातील संकटांपासून संरक्षण मिळावे, सुख-शांती नांदावी, ही सामूहिक प्रार्थना केली. कार्यक्रमस्थळी वरण-भात, बट्टी, मटकी आणि शिऱ्याचा महाप्रसाद देण्यात आला असून परिसरातील एक हजारांहून अधिक नागरिकांनी त्याचा लाभ घेतला.
मूर्ती स्थापनेपूर्वी गावातून माकडाच्या मूर्तीची ढोल-ताशांसह सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या संपूर्ण उपक्रमात निवृत्त सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक काशिनाथ एकनाथ पाटील, शेतकरी विश्वास सुपडू पाटील आणि इतर ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. विशेष म्हणजे मूर्ती स्थापना झालेल्या ठिकाणी माकडांचा समुदाय सतत जमू लागल्याने हा योगायोग गावात विशेष चर्चेचा विषय ठरला आहे.
मेहूटेहू येथे २ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १२.३० वाजता विद्युत तारेचा स्पर्श होऊन एका माकडाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गावकऱ्यांनी जमून त्या माकडाची अंत्ययात्रा काढली होती. मारुती मंदिराजवळ शास्त्रोक्त पद्धतीने दफनविधी करून सुतक, दशक्रिया व उत्तरकार्यही करण्यात आले होते. अनेक ज्येष्ठ-तरुणांनी केसदान करत मुंडणही केले होते. याच माकडाच्या वर्षश्राद्ध तिथीनुसार गेल्या शुक्रवारी मूर्ती स्थापना सोहळा पार पडला.









