जळगाव शहरात कानळदा रस्त्यावरील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) : – मजूरीच्या पैसे देण्याच्या कारणावरुन वाद होवून चार जणांच्या टोळक्याने दगडफेक करीत भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या प्रवीण उर्फ सोनू देवरे (रा. कानळदा रोड) याच्यावर धारदार चाकू, कोयत्याने वार करीत जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना दि. ९ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास कानळदा रस्त्यावर घडली. याप्रकरणी संशयितांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील मेहरुण परिसरातील जोशी वाडा परिसरात रेखा जगदिश खत्री (वय ४८) या वास्तव्यास असून त्यांचा मुलगा संजय खत्री व त्याचा मावशीचा मुलगा प्रवीण उर्फ सोनू देवरे हा कानळदा रोडवर भाडेतत्वावर राहतो. संजय खत्री हा केटर्सच्या ठिकाणी जेवण वाढण्याकरीता मजूर पुरविण्याचे काम करतो. तर प्रवीण देवरे हा सेंट्रींग काम करतो. यश सपकाळे हा संजय खत्री यांच्याकडे केटर्सचे काम करण्यासाठी जात होता. त्याच्या कामाचे १३०० रुपये संजय खत्री यांच्याकडे देणे बाकी होते.
त्या करीता दि. ९ रोजी दुपारच्या सुमारास ध्रुव निंबाळकर, उदय उर्फ चौका, भावेश सपकाळे, रोहीत धुमाळ, तुषार खंडागळे हे गेले होते. त्यांनी संजय खत्री याला यशच्या कामाचे पैसे आम्हाला दे असे सांगितले. त्यावेळी खत्री याचे यश सपकाळे याला माझ्याकडे घेवून या मी त्याच्या हातात पैसे देतो असे सांगितले होते. त्यावेळी चौघांनी संजय खत्री याला मारहाण करुन ते तु आम्हाला पैसे कसे देत नाही ते पाहतोच असे म्हणत तेथून निघून गेले होते.
संजय खत्री याने हा प्रकार त्याच्या आईला फोन करुन सांगितला होता. त्यावेळी त्यांनी मी कामावरुन आली की, लगेच तुझ्याकडे येते असे सांगितले होते. दरम्यान, खत्री कुटुंबियांनी जेवण करुन ते घराबाहेर बसले होते. त्यावेळी ध्रुव निंबाळकर त्याच्यासोबत उदय चौका, भावेश सपकाळे, रोहीत धुमाळ व तुषार खंडागळे हे त्याठिकाणी आले. त्यांनी संजय खत्री याला त्यांच्याकडे बोलावून घेत त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. जोरजोरात शिवीगाळ करीत असल्यामुळे खत्री कुटुंबियांसह त्यांचे घरमालक व प्रवीण देवरे हे भांडण सोडविण्याकरीता तेथे गेले.
त्यावेळी टोळक्याने त्यांच्यावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. प्रवीण उर्फ सोनू देवरे हा संजय खत्री याला वाचविण्याकरीता तेथे गेला असता, ध्रुव निंबाळकर, उदय उर्फ चौका यांनी चाकूने त्याच्या कमरेवर आणि छातीवर भोसकले. तर भावेश सपकाळे याने वाचविण्यासाठी गेलेल्या महिलेला लोखंडी रॉडने मारहाण केली.
तरुणावर टोळक्याने शसस्त्र हल्ला करीत त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. रेखा खत्री या प्रवीण देवरे याला वाचविण्याकरीता तेथे गेल्या असता, त्यांना तुषार खंडागळे याने लोखंडी पाईप मारुन त्यांना देखील जखमी केले आणि हल्लेखोर तेथून पसार झाले. प्रवीण देवरे हा गंभीर जखमी झाल्याने तो बेशुद्ध पडला होता. त्याला लागलीच जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरु आहे.
जखमी रेखा खत्री यांनी उपचार घेतल्यानंतर शहर पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार ध्रुव निंबाळकर, उदय उर्फ चौका, भावेश सपकाळे, रोहीत धुमाळ, तुषार खंडागळे यांच्याविरुद्ध प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील भावेश सपकाळे, रोहीत धुमाळ, तुषार खंडागळे, उदय निसाळकर यांना अटक करण्यात आली आहे.