अमळनेर तालुक्यातील निमझरी येथील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) :– पैसे मागण्यासाठी शेतमजुराने ब्लेडने शेतमालकाच्या मानेवर व कानावर वार करून जखमी केल्याची घटना दि. २३ रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास निमझरी येथे घडली. अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रावसाहेब चिंधु पाटील यांच्याकडे देविदास दगा कोळी हा मजुरी करतो. दि. २३ रोजी सायंकाळी साडे चार वाजता घरी आला आणि मजुरीचे पैसे मागू लागला. तुला मजुरीचे पैसे दिले आहेत असे रावसाहेब पाटील यांनी सांगताच देविदास शिवीगाळ करत निघून गेला. त्यानंतर साडेपाच वाजेच्या सुमारास रावसाहेब हे साकरे रस्त्यावर उभे असताना देविदास याने मागाहून येत रावसाहेबच्या कानावर व मानेवर चार पाच वेळेस ब्लेडने वार केले.
त्यांच्या कानातून व मानेतून रक्त वाहू लागले. जवळच्या लोकांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी दवाखान्यात जाऊन जखमी रावसाहेबचा जबाब घेतल्यानंतर अमळनेर पोलीस स्टेशनला देविदास कोळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल सुनील जाधव करीत आहेत.