जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील दापोरा येथील रहिवासी इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी २१ जून रोजी उघडकीस आली आहे. तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.
आत्माराम धनराज मिस्तरी (वय ५५, रा. दापोरा ता.जि. जळगाव) असे मयत इसमाचे नाव आहे. ते मजुरी काम करून उदरनिर्वाह करतात. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, १ मुलगी असा परिवार आहे. दापोरा येथे आज बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्यांनी घराच्या पाठीमागे असलेल्या गोठ्यात पत्राच्या शेडमध्ये दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. आजूबाजूच्या नागरिकांना कळताच त्यांनी त्याला जळगावच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केले.
आत्माराम मिस्तरी यांनी कुठल्यातरी नैराश्याच्या भरात आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, कुटुंबीयांनी रुग्णालयात आक्रोश केला.