जळगाव तालुक्यातील लमांजन येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील लमांजन गावात मजुरीसाठी आलेल्या मध्य प्रदेशातील एका व्यक्तीचा, गिरणा नदीच्या काठावर आंघोळीसाठी गेला असता पाय घसरून बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दि १४ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता घडली. बुधवार दि. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता नदीपात्रातून त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जयसींग सुभाष बारेला (वय ४०, मूळ रा. शिरवेल, मध्य प्रदेश) हे लमांजन येथे मजुरीसाठी वास्तव्यास होते. मंगळवारी दुपारी ३ वाजता ते गिरणा नदीकाठी आंघोळीसाठी गेले होते. सायंकाळपर्यंत घरी न परतल्यामुळे त्यांची वृद्ध आई आणि घरी आलेल्या बहिणीला चिंता वाटू लागली. त्यांनी नदीपात्र परिसरात पाहणी केली असता, नदीच्या किनाऱ्यावर जयसींग यांचे कपडे आणि मोबाईल फोन आढळला. भाऊ नदीत बुडाल्याच्या संशयावरून जयसींग यांच्या आई व बहिणीने तातडीने लमांजन गावाचे पोलीस पाटील भाऊराव पाटील यांना कळवले.
रात्री उशिरापर्यंत नदीपात्रात शोध घेण्यात आला, मात्र जयसींग बारेला आढळून आले नाहीत. अखेर बुधवारी सकाळी गिरणा नदी पात्रातून त्यांना बाहेर काढले असता, त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला. यावेळी कुटुंबीयांनी आक्रोश केला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.