जळगाव ( प्रतिनिधी ) – भुसावळचे राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष चौधरी यांचा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विकास सोसायटी गटातून अर्ज बाद झाल्याने खळबळ उडाली होती. त्यांनी सहकारी संस्थांच्या विभागीय सहनिबंधकाकडे अपिल दाखल केले त्यावर २६ ऑक्टोबररोजी सुनावणी होणार आहे.
या सुनावणीला उपस्थित न राहिल्यास अपिलकर्त्याचे काहीएक म्हणणे नाही, असे समजून निकाल दिला जाईल, असे विभागीय सहनिबंधक ज्योती लाठकर यांनी म्हटले आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आतापर्यंत महाविकास आघाडीच्या सहा जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीत रंगत आली आहे. खासदार रक्षा खडसे, माजी आ. स्मिता वाघ, जि.प. सदस्या माधुरी अत्तरदे व भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांचा अर्ज बाद झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. चौधरी यांच्या सुनावणीच्या या निकालाकडे राजकीय दिग्गजांचे लक्ष लागले आहे.