एरंडोल शहरातील महिलेची सायबर पोलीस स्टेशनला धाव
जळगाव (प्रतिनिधी) – बँक ऑफ महाराष्ट्र च्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून महिलेला व्हाट्सअप वरील एप्लीकेशन लिंक पाठवून ती डाऊनलोड करण्याचे सांगून तीन जणांनी ८ लाख ५५ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. प्रकरणी सायबर पोलीस स्टेशनला महिलेच्या फिर्यादीवरून तीन अज्ञात मोबाईल धारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शर्मिला अनिल चिकाटे (वय ५०, रा. रामदास कॉलनी, एरंडोल) या महिलांनी फिर्याद दिली आहे. ४ ऑगस्ट रोजी शर्मिला चिकाटे यांच्या मोबाईल क्रमांकावर बँक ऑफ महाराष्ट्रच्या कस्टमर केअर मधून बोलत असून तुमची बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये गेलेली रक्कम मिळवून देण्याच्या बहाण्याने ४ मोबाईल क्रमांकावरून संपर्क केला. शर्मिला चिकाटे यांना व्हाट्सअप क्रमांकावर एप्लीकेशनची लिंक पाठवून एप्लीकेशन डाउनलोड करण्यास सांगितले.
त्यानंतर शर्मिला यांच्या मोबाईल वरूनच त्यांनी त्यांच्या कॅनरा बँक खात्याची माहिती चोरून त्या खात्यामधून ८ लाख ५५ हजार रुपयांची रक्कम ऑनलाईन काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. शर्मिला चिकाटे यांच्या फिर्यादीवरून सायबर पोलीस स्टेशनला ४ मोबाईल धारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक बी.डी.जगताप करीत आहे.