जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील एमआयडीसी परिसरात वाढत्या लुटमाराच्या घटनांना आळा घालत पोलिसांनी अयोध्या नगर भागात महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढणाऱ्या दोन दुचाकीस्वारांना अवघ्या काही दिवसांत जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. अत्यंत कसून तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे रचलेल्या सापळ्यातून दोन्ही आरोपींना पकडण्यात आले असून चोरीस गेलेली सोन्याची लगडही ताब्यात घेण्यात आली आहे.
दि. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी, अयोध्या नगरात एक महिला दुचाकीने घरी परतत असताना मागून आलेल्या दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी तिच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने खेचून पोबारा केला होता. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधित प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक ८४९/२०२५ भादंवि कलम ३०९(४), ३(५) नुसार गुन्हा दाखल झाला होता.
गुन्ह्यानंतर तपास पथकाने गुप्त बातमीदारांच्या मदतीने माहिती गोळा केली. १८ नोव्हेंबर रोजी माऊली नगर भागात सापळा लावून पोलिसांनी एक संशयित आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव तेजस अनिल ईखनकर (रा. ज्ञानदेव नगर, जळगाव) असे सांगितले आणि गुन्ह्याची कबुली देत साथीदार प्रसाद उर्फ परेश संजय महाजन (रा. ज्ञानदेव नगर) याचे नाव सांगितले. विशेष म्हणजे, प्रसाद उर्फ परेश हा शनिपेठ पोलिस ठाण्यातील खुनाच्या गुन्ह्यातून फरार होता.
त्यानंतर १९ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी माऊली नगर भागातून प्रसाद उर्फ परेश महाजन यालाही ताब्यात घेतले. दोघांकडून ८ ग्रॅम वजनाची, किंमत अंदाजे ८० हजार रुपये असलेली सोनसाखळी पोलिसांनी हस्तगत केली. या कारवाईनंतर परिसरातील रहिवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
ही कारवाई एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात पोउनि राहुल ताडे, पोउनि चंद्रकांत के., सफौ विजयसिंग पाटील, पोह प्रदीप चौधरी, पोह गिरीश पाटील, पोह प्रमोद लावंजारी, पोह किरण पाटील ठाकूर, पोकॉ किरण पाटील, पोकॉ शशिकांत मराठी, पोकॉ चेतन पाटील यांचा समावेश होता. या कारवाईस पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांचे मार्गदर्शन लाभले.









