पारोळा बसस्थानक परिसरातील घटना
पारोळा (प्रतिनिधी) :- येथील बस स्थानकात धुळे जिल्ह्यातील मोराणे येथील एका ६५ वर्षीय महिलेच्या दोघा हातातील सोन्याच्या बांगड्या कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना दिनांक १९ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. पारोळा पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.
प्रमिला हंसराज सूर्यवंशी (वय ६५ रा. मोराणे ता जि धुळे) ह्या धुळे बस स्टॅण्डवरून ११ वाजता धुळे-जळगावं भुसावळ गाडीत बसले. दुपारी १२ वाजता पारोळा उत्तरले. त्यानंतर १.३० वाजता भडगाव जाण्यासाठी पारोळा येथून शिरसमणी, टिटवी, महिंदळे मार्गे जाणारी भडगाव बसमध्ये बसत असताना त्यांच्या दोन्ही हातातील ५ तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या कोणीतरी अज्ञात चोरट्याने कटरने कापून चोरून नेल्यात. त्यांना बसमध्ये बसल्यानंतर मेहूटेहू, जोगलखेडे दरम्यान समजले.
त्यांनी लगेच कंडक्टर यास वाहन थांबवण्यास सांगितले. बसमध्ये तपास केला असता मिळून आले नाही. म्हणून त्यांना कंडक्टरने पारोळ्याकडे जाणाऱ्या बसमध्ये बसवून दिले. त्यानंतर त्यांनी सरळ पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी त्यांची माहिती घेऊन सीसीटीव्ही फुटेज तपासणीला सुरुवात केली. यावेळी त्यांचे पती व नातेवाईक सुद्धा सोबत होते. सदर हातातील सोन्याच्या बांगड्या ह्या मनगटावर, पुढे दहा दहा काचेच्या बांगड्या होत्या त्यानंतर शेवट सोन्याच्या बांगड्या असताना देखील चोरट्याने अतिशय चलाखीने बांगड्या कटरने कापून चोरून नेल्याची ही धक्कादायक घटना आहे.