यावल पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी
यावल ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील साकळीतील चौधरी वाड्यात झालेल्या घरफोडीची अवघ्या २४ तासात यावल पोलिसांनी उकल केली. स्थानिक संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला २८ सप्टेंबरपर्यंत ४ दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
साकळी गावातील चौधरी वाड्यात रुपाली रमेश महाजन (वय ३२) राहतात. त्यांच्या घराचा बंद दरवाजा उघडून अज्ञात चोरट्याने कपाटातून ५५ हजारांची रोकड चोरी केली. ही घटना बुधवारी उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. यावल पोलिसांनी अवघ्या २४ तासातच या गुन्ह्याचा तपास लावत साकळी गावातील रहिवासी महेंद्र गोकुळ बडगुजर याला अटक केली.
संशयित आरोपीला यावल येथील प्रथम वर्ग न्यायाधीश आर.एस. जगताप यांच्या समोर हजर केले असता त्याला २८ सप्टेंबरपर्यंतची ४ दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अर्जुन सोनवणे करीत आहे.