जळगाव (प्रतिनिधी) :- मानसिक विकाराने ग्रस्त असलेल्या ३० वर्षीय महिलेच्या दोन्ही डोळ्यांमध्ये झालेल्या गंभीर मोतीबिंदूवर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. या यशस्वी उपचारामुळे रुग्णेला पुन्हा दृष्टी प्राप्त झाली आहे.
याबाबत माहिती अशी की, छायाबाई पाटील (वय ३०) महिला गेल्या काही काळापासून मानसिक आजाराच्या उपचाराखाली होती. मानसिक आजारामुळे नियमित तपासणी, औषधोपचार आणि स्वतःच्या तक्रारी मांडण्यात अडचणी येत असल्याने तिच्या डोळ्यांच्या आजाराकडे दुर्लक्ष झाले. दरम्यान, हळूहळू दोन्ही डोळ्यांत मोतीबिंदू वाढत गेला आणि तिची दृष्टी जवळपास पूर्णपणे बंद झाली. नातेवाईकांनी तिला पुढील उपचारासाठी डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात दाखल केले. येथे नेत्रविकार तज्ज्ञ डॉ. रेणुका पाटील यांनी तिची सखोल तपासणी केली. तपासणीत दोन्ही डोळ्यांत प्रगत अवस्थेतील मोतीबिंदू असल्याचे निदान झाले. मानसिक आजार लक्षात घेता शस्त्रक्रिया करणे हे आव्हानात्मक होते. रुग्णाची मानसिक स्थिती, औषधांचे नियोजन, भूल देण्याची पद्धत आणि शस्त्रक्रियेनंतरची काळजी या सर्व बाबींचा बारकाईने विचार करून उपचाराचा निर्णय घेण्यात आला.नेत्रविकार तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ आणि नर्सिंग स्टाफ यांच्या समन्वयातून टप्प्याटप्प्याने दोन्ही डोळ्यांवरील मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षित पद्धतीचा वापर करून ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. शस्त्रक्रियेनंतर काही दिवसांतच रुग्णेच्या दृष्टीत लक्षणीय सुधारणा दिसून आली.रुग्णेला स्पष्ट दिसू लागल्यानंतर तिच्या चेहर्यावर आनंद आणि समाधान झळकत होते. शस्त्रक्रियेसाठी डॉ. मयूरी निलावाड यांच्यासह टीमने सहकार्य केले. नातेवाईकांनीही डॉक्टर आणि संपूर्ण वैद्यकीय टीमचे आभार मानले.

मानसिक विकार असलेल्या रुग्णांमध्ये शारीरिक आजारांकडे अनेकदा दुर्लक्ष होते. मात्र योग्य नियोजन, टीमवर्क आणि काळजीपूर्वक उपचार केल्यास अशा रुग्णांनाही उत्कृष्ट परिणाम देता येतात. मोतीबिंदू हा उपचारयोग्य आजार आहे, वय कमी असले तरी तो होऊ शकतो. वेळेवर तपासणी आणि उपचार अत्यंत महत्त्वाचे आहेत.
– डॉ. रेणूका पाटील, नेत्रविकार तज्ज्ञ, डॉ. उल्हास पाटील रूग्णालय.









