जळगाव शहरातील महात्मा फुले मार्केट परिसरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील फुले मार्केट परिसरामध्ये साड्या व सामान खरेदी करण्यासाठी आलेल्या महिलेच्या पर्समधून ५० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना बुधवारी दि. १२ मार्च रोजी दुपारी ४ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
अरुणा आनंदराव महाडिक (वय ५५, रा. रावेर) या महिला जळगाव शहरातील फुले मार्केट येथे साड्या व सामान खरेदी करण्यासाठी बुधवारी १२ मार्च रोजी दुपारी ४ वाजता आलेल्या होत्या. दरम्यान त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या पर्समधून ५० हजार रुपयांची रोकड चोरून नेली. ही घटना उघडकीला आल्यानंतर महिलेने जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सतीश पाटील करीत आहे.