जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील रामानंद नगर परिसरात एका ५५ वर्षीय महिलेचे दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी ८५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र लांबवल्याची घटना चार जुलै रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, रामानंदनगर परिसरात असणाऱ्या जीवन नगर मध्ये राहणाऱ्या अशा ज्ञानेश्वर महाले ( वय – ५५ ) ह्या चार जुलै रोजी सायंकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास रस्त्याने पायी जात असताना एका दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील ८५ हजार रुपये किमतीचे १७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र तोडून पळ काढला. आशा महाले यांनी आरडाओरड करूनही उपयोग झाला नाही. याबाबत आशा महाले यांनी तात्काळ रामानंदनगर पोलीस स्टेशन गाठून दोन अज्ञात विरुद्ध फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे करीत आहे.