खून करून जंगलात फेकले असण्याची शक्यता, एरंडोल तालुक्यातील पद्मालय देवस्थान जवळची जंगलातील घटना
जळगाव ( विशेष प्रतिनिधी ) – एरंडोल तालुक्यातील पद्मालय गणेश देवस्थानाच्या परिसरापासून नागदूलीकडे जाणाऱ्या जंगलामध्ये एका अज्ञात अंदाजे तीस वर्षीय महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान सदर महिलेचा खून करून जंगलात पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने फेकून दिले असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. पोलिसांचे पथक सर्व दिशेने तपास करत आहे.



एरंडोल तालुक्यातील पद्मालय ते नागदुली रस्त्यावर असणाऱ्या जंगलामध्ये काही गुराखी त्यांची गुरे चारण्यासाठी गेली होती.(केसीएन) एका गुराखीला जंगल परिसरामध्ये अज्ञात महिलेचा कमरेपासून तोंडापर्यंत अर्धवट जळालेल्या अवस्थेमध्ये मृतदेह दिसला. या मृतदेहाचे फक्त पाय दिसत होते आणि बाकी इतर भाग जळालेल्या अवस्थेत होते. त्यांनी तत्काळ ग्रामस्थांना माहिती दिली. तसेच एरंडोल पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली.

यानंतर तात्काळ पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सर्व बाजूने माहिती घेण्यास सुरुवात केली. घटनास्थळी श्वानपथक, ठसे पथक आणि मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन पथक दाखल झाले.(केसीएन) या ठिकाणी पोलिसांनी काही नमुने ताब्यात घेतले आहे. सदर या घटनेत ज्वलनशील पदार्थाचा वापर करून महिलेला जाळण्यात आलेले आहे, असे प्राथमिक तपासात दिसत आहे. दरम्यान संध्याकाळी ५ वाजेनंतर सदरचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, एरंडोल पोलीस स्टेशनचे निरीक्षक निलेश गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड हे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी त्यांचा तपास सुरू केला आहे. दरम्यान सदर महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून पोलिसांपुढे ओळख पटविणे हे मोठे आव्हान आहे.
घटनेमुळे एरंडोल तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांची विविध पथके तपासासाठी रवाना झाली आहेत. सदरचा खून हा नियोजनबद्ध असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यांनी पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने हा परफेक्ट मर्डर केल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांना दिसून आले आहे.









