बनावट मृत्यूपत्राद्वारे भावाच्या पत्नीसह मुलांचा बळकावला हक्क
जळगाव (प्रतिनिधी) :- महिलेचे सासरे मयत झाल्यानंतर त्यांच्या नावे बनावट मृत्यूपत्र तयार करुन त्यांच्या लहान भावाच्या दोन्ही मुलांसह पत्नीचा हक्क बळकविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी न्यायालयाने दिलेल्या आदेशावरुन संशयित सासु, जेठ, दिरांसह इतर नातेवाईक व एक महिला वकील अशा आठ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील निमखेडी शिवारातील विश्राम नगरात श्रद्धा योगेश देसाई (वय ३९) या ह.मु. सिंहगड रोड पुणे येथे वास्तव्यास आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा विवाह दि. २६ जुन २००४ रोजी योगेश देविदास देसाई यांच्या सोबत झाला होता. लग्नानतर त्यांना मुलगा लेण्याद्री (वय १८) व मुलगी अंजली (वय १२) अशी दोन अपत्य झाली. पतीच्या अतिमद्यसेवनामुळे त्यांनी सासर सोडून माहेरी भावाकडे निघुन गेल्या होत्या. पतीची दारु सुटावी म्हणून पती योगेश काही दिवस त्यांच्यासोबत राहिले, नंतर जळगावी निघुन आले. दरम्यान, दि. ३० एप्रील २०१५ मध्ये सासरे देविदास यादवराव देसाई यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर चार वर्षांनी फिर्यादीचे पती योगेश यांचे दि. २९ जुन २०१९ निधन झाले.
सासऱ्यांच्या निधनानंतर एकत्रीत असलेल्या कुटुंबात कधीच प्रॉपर्टीचे वाद झाले नाही. मात्र, पतीच्या निधनानंतर सासरच्या मंडळींची वागणुक बदलली. वडीलोपार्जीत प्रॉपर्टीवर दोन्ही मुलांची नावे लावण्याची मागणी केल्यावर मात्र, सासु-जेठ व इतर मंडळींनी फारसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे विवाहितेने दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता. सासऱ्यांच्या मृत्यूपश्चातही असे मृत्युपत्रा बाबत काहीच वाद नसतांना, वारस हक्कासाठी न्यायालयात दिवाणी दावा दाखल असून न्यायालयीन वाद सुरु असतांना पर्यंत मृत्युपत्राचा विषय नव्हता. मात्र, अचानक एका त्रयस्थ व्यक्तीच्या नावे स्टॅम्प खरेदी करुन, सासरे मयत असतांना त्यांच्या ऐवजी खोटा माणूस उभा करून अॅड. कालिंदी चौधरी यांच्या कडून मृत्युपत्र नोटरी करवुन घेत प्रॉपटी बळकावल्याचा आरोप तक्रारदारांनी केला होता.
सुरवातीला पोलिसांत तक्रार दिली. मात्र त्यांनी दखल न घेतल्याने प्रथमवर्ग न्यादंडाधिकारी न्यायालयात दाद मागीतल्याने न्यायालयाच्या आदेशाने शहर पोलिस ठाण्यात उषाबाई देवीदास देसाई (वय ७०), दिपक देविदास देसाई (वय ५०), राजेश देविदास देसाई (वय ४३), स्वाती मधुकर देशमुख (वय ५२), आनंदराज गोविंदा पाटील (रा. भडगाव), रमेश उत्तमराव पवार (वय ६०), अशोक प्रभाकर पवार (वय ६०) यांच्यासह अॅड. कालिंदी चौधरी अशा ८ संशयीतांच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात खोटेदस्तऐवज खरे असल्याचे भासवुन फसवणुक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.