जळगाव (प्रतिनिधी) : येथील डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७० वर्षीय महिला रुग्णावर अत्यंत गुंतागुंतीची आणि जोखमीची डॅक्रो-सिस्टो-र्हायनोस्टोमी शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.

याबाबत माहिती अशी की, खंडाळा येथील अंजनाबाई चव्हाण (वय ७०) या महिलेला गेली १० वर्षे रुग्णाच्या डाव्या डोळ्यातून सतत पाणी येणे, तसेच नाकाच्या बाजूला फोड होऊन त्यातून घाण व दुर्गंधीयुक्त द्रवपदार्थ बाहेर पडणे अशी गंभीर समस्या ती भोगत होती. या त्रासामुळे रुग्ण शारीरिक तसेच मानसिक दृष्ट्या अत्यंत त्रस्त झाली होती. अशा परीस्थितीत रुग्णाची प्राथमिक तपासणी कान-नाक-घसा विभाग प्रमुख डॉ. अनुश्री अग्रवाल यांनी केली. तपासणीदरम्यान डोळा व नाक यांच्या जोडणार्या अश्रुधारांच्या मार्गात अडथळा निर्माण होऊन नासूर तयार झाल्याचे स्पष्ट झाले. ही स्थिती दीर्घकाळ उपचार न घेतल्यामुळे अधिक गंभीर झाली होती. याशिवाय रुग्णाला हृदयविकार आणि उच्च रक्तदाब असल्यामुळे शस्त्रक्रिया करणे अत्यंत धोकादायक ठरू शकत होते. तरीही, रुग्णाच्या वेदना आणि वाढत्या गुंतागुंतीचा विचार करून डॉ. अनुश्री अग्रवाल यांच्यासह डॉक्टरांच्या टीमने जोखीम स्वीकारून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. सर्व आवश्यक तपासण्या, हृदय विभागाचे प्री-अनेस्थेटिक मूल्यांकन आणि विशेष काळजी घेत ही शस्त्रक्रिया नियोजित करण्यात आली. डॅक्रो सिस्टो र्हायनोस्टोमी ही अत्यंत सूक्ष्म व तांत्रिक कौशल्याची प्रक्रिया आहे. या शस्त्रक्रियेद्वारे अश्रुधारांच्या ब्लॉक झालेल्या मार्गाला नवीन नैसर्गिक मार्ग देऊन नासूराची समस्या दूर केली जाते. शस्त्रक्रिया सुमारे दीड ते दोन तास चालली आणि कोणतीही गुंतागुंत न होता ती यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर काही तासांतच रुग्णांची प्रकृती स्थिर झाली. डोळ्यातील पाण्याचा त्रास थांबला असून नाकाजवळील फोड आणि नासूरातून येणारा दाहही कमी झाला आहे. रुग्ण सध्या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली असून तिची प्रकृती समाधानकारक असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. या शस्त्रक्रियेसाठी डॉ. पंकजा बेंडाळे, डॉ. सृष्टी पाटील, डॉ. शुभम सावरकर, डॉ. पंकज शर्मा, डॉ. अंकीत सोलंकी यांनी सहकार्य केले.
रुग्णाला दीर्घकाळापासून असलेली समस्या आणि तिचे हृदयविकार तसेच उच्च रक्तदाब लक्षात घेता ही शस्त्रक्रिया आव्हानात्मक होती. परंतु योग्य नियोजन, अनुभवी टीमवर्क आणि अत्याधुनिक उपकरणांमुळे शस्त्रक्रिया सुरक्षितरीत्या पार पडली.
– डॉ. अनुश्री अक्ष्रवाल नाक-कान-घसा तज्ज्ञ, डॉ. उल्हास पाटील रूग्णालय.









