जळगाव शहरातील टॉवर चौक येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : नवीन बसस्टॅण्ड येथून आसोदा-जळगाव बस मध्ये प्रवास करणाऱ्या आजीबाईला वाहकाने गर्दीत, ‘पुढे सरका’ इतकेच बोलल्याचा राग आला. त्या वृद्धेने महिला कंडक्टरशी हुज्जत घालत त्यांच्या हाताला कडाडून चावा घेत जखमी केले. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास टॉवर चौकात घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहर बसस्थानकातून नरगीस खलील मनियार (वय ३६, रा.एस.टी. कॉलनी, जळगाव) या महिला वाहक व बस चालक बापु बाबुराव कोळी असे जळगाव ते नंदगाव (एमएच. १४ डी.टी. २१७५) या क्रमांकाची बस घेवुन संध्याकाळी ५ वाजता निघाले. प्रवााश्यांनी गच्च भरलेली बस मधील प्रवाश्यांना मागील खाली सिटवर बसवण्यासाठी पुढे सरकवत असतांना एक वृद्धेला महिला कंडक्टरचा राग आला. आजी पुढे जागा करुन देते, पुढे सरका असे सांगीतल्यावर हि वृद्धा अधिकच चिडली. तिने विनाकारण हुज्जत घालून महिला कंडक्टरला शिवीगाळ करत चालत्या बस मधुन फेकुन देण्याची धमकी दिली. या वृद्धेची समजुत काढण्यासाठी बसमधील एक जेष्ठ किर्तनकार महाराजांनी मध्यस्थी केली असता या वृद्धेने त्याच्यावरही चप्पल उगारत शिवीगाळ केल्याचे बसमधील प्रवाश्यांनी सांगीतले.
ती वृद्ध महिला एवढ्यावर न थांबता तीने महिला कंडक्टरचा हात धरुन पिरघळला आणि चक्क पंज्यावर कडाडून चावा घेतल्याने हातातून रक्त आले. घडल्या प्रकाराने बस मध्ये एकच गोंधळ उडाल्याने चालकाने बस थेट शहर पोलिस ठाण्यात आणली. बस पोलिस ठाण्यात आणल्यावर महिला कंडक्टरने घडलेली घटना पोलिसांना सांगितली. महिला पोलिस कर्मचारी या वृद्धेची चौकशी केली असता, तीने सुशिलाबाई उखडू शिरसाठ (वय-७०, रा. नांद्रा) असे सांगीतले. याप्रकरणी महिला वाहकाच्या फिर्यादीवरुन त्या वृद्धेविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.