शिर्डी ( वृत्तसंस्था ) – साईभक्त महिलेला जनसंपर्क विभागातील अधिकाऱ्याने फोनवर अश्लील फोटो व व्हिडीओ पाठवल्याची लेखी तक्रार साईबाबा संस्थानकडे आली आहे. गैरकृत्य करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या संघटक स्वाती परदेशी यांनी साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्याकडे केली आहे.
जनसंपर्क कार्यालयात अनेक भाविक आरती आणि दर्शन पाससाठी येत असतात. आरती आणि दर्शनाच्या नावाखाली जनसंपर्क कार्यालयातील अधिकाऱ्याने मुंबई तसेच आसाम, गुवाहाटी येथील साईभक्त महिलांशी जवळीक केली. नंतर मोबाईलवरुन अश्लिल चित्रफित आणि मेसेज पाठवले. या महिलांनी संस्थानकडे लेखी तक्रार केली यावर शिर्डी साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी सध्या तरी बोलण्यास नकार दिला आहे. संबंधित महिला साईभक्तांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली नाही.