पोलीस भरतीसाठी पोलीस अधीक्षकांची सूचना
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्हा पोलीस भरतीकरिता अनेक उमेदवारांनी दोन पदांकरिता अर्ज केले आहे. तसेच अनेकांना दोन पदांकरिता मैदानी चाचणीसाठी एकाच दिवशी किंवा लागोपाठ बोलावल्याची स्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना सोयीचे व्हावे याकरिता त्यांना दुसऱ्या पदासाठी दुसरी तारीख दिली जाणार आहे. याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत सोमवारी दि. १७ जून रोजी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील रिक्त पदे भरणेसाठी मैदानी चाचणी परीक्षा दिनांक १९ जूनपासून संपूर्ण राज्यभर सुरु होणार आहे. उमेदवारांना विविध पदांकरिता (पोलीस शिपाई, चालक, बँडसमन, सशस्त्र पोलीस शिपाई, तुरुंग विभाग शिपाई) एका घटकात किंवा वेगवेगळ्या घटकांत अर्ज करता येतात. त्यानुसार काही उमेदवारांना एकाच दिवशी अथवा लागोपाठचे दिवशी दोन पदांकरिता मैदानी चाचणी साठी हजर राहणे बाबतची स्थिती निर्माण होवू शकते व त्यामुळे काही उमेदवारांची गैरसोय होवू शकते. म्हणून सर्व घटक प्रमुखांना व महा आयटी विभागास सूचना देण्यात आली आहे.
ज्या उमेदवारास एकच वेळी दोन पदांकरिता मैदानी चाचणीस हजर राहणेसाठी सूचना दिली असेल असा उमेदवार पाहिल्या ठिकाणी हजर राहिल्या नंतर त्या उमेदवारांना दुसरी ठिकाणी वेगळी तारीख देण्यात यावी. दुसऱ्या ठिकाणचे घटक प्रमुखांनी अशा उमेदवारांची मैदानी चाचणी घ्यावी. तसेच मैदानी चाचणीची पहिली तारीख आणि दुसरी तारीख यामध्ये किमान ४ दिवसांचे अंतर असावे. मात्र या करिता उमेदवार पहिल्या मैदानी चाचणीस हजर होता याचे लेखी पुरावे दुसऱ्या मैदानी चाचणीवेळी सादर करावे लागतील.
”पोलिस भरती २०२२-२३ मधे ज्या उमेदवारांनी एका पेक्षा जास्त पदांकरिता अर्ज केले आहेत आणि त्यांची मैदानी चाचणी एकाच दिवशी आली असेल अश्या उमेदवारांना किमान ४ दिवस अंतराने वेगवेगळ्या तारखा दिल्या जातील. उमेदवारांना अडचण / शंका असल्यास त्यांनी raunak.saraf@mahait.org यावर ईमेल करावा”असे जनसंपर्क अधिकारी, जळगाव पोलीस यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.