प्रभाग १९ मध्ये आ. एकनाथराव खडसे यांची तोफ धडाडली
अलका सपकाळ (देशमुख) यांच्या प्रचारासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार अलका राजेंद्र सपकाळ (देशमुख) यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक १९ मध्ये भव्य नागरी बैठक संपन्न झाली. या बैठकीत ज्येष्ठ नेते आ. एकनाथराव खडसे यांनी महायुती सरकारच्या धोरणांवर सडकून टीका करत कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरला.


“जनतेच्या विकासकामांच्या आड येणाऱ्या महायुतीला त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे,” अशा शब्दांत नाथाभाऊंनी महायुतीचा समाचार घेतला. प्रभाग १९ च्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, महानगराध्यक्ष एजाज मलिक आणि १९ ‘ड’ चे उमेदवार संग्रामसिंह सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत बोलताना आ. खडसे म्हणाले की, विद्यमान सरकारने केवळ घोषणाबाजी केली असून सर्वसामान्यांचे प्रश्न प्रलंबित ठेवले आहेत. आता बदल घडवण्याची गरज असून, अलका सपकाळ आणि संग्रामसिंह सूर्यवंशी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित नागरिकांना केले.









