जळगावात रामेश्वर कॉलनीतील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) –शहरात मास्टर कॉलनीत शुक्रवारी उच्चदाब वीज वाहिनीला स्पर्श झाल्याने तीन जणांना जीव गमवावा लागल्याच्या घटनेला ४ दिवस होत नाही तोच रामेश्वर कॉलनीत अशोक किराणा चौकात उच्चदाब वीज वाहिनी तुटून अंगावर पडल्याने दुचाकीवर बालकासह उभा असलेला तरुण गंभीर भाजला. ही घटना सोमवारी रात्री ९.३० वाजता घडली. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.

उमेर शेख सलीम (वय १८, रा. दत्तनगर, मेहरूण) हा जखमी झाला. उमेर शेख हा एकासह दुकानावर २ वर्षीय बालक असानला सोबत घेवून गेला होता. त्याच्यासोबतची व्यक्ती दुकानात गेली असताना उमेर हा असानला घेवून गाडीवर बसला होता. त्याचवेळी ही घटना घडली. त्यात असानही जखमी झाला आहे.
शहरातील मास्टर कॉलनीत शुक्रवारी ११ केव्ही उच्चदाबाच्या वीजवाहिनीला स्पर्श होऊन तीन निष्पाप बळी गेले. तत्पूर्वी २०१८ मध्येही इथे दोन जणांना जीव गमावावा लागला होता. तेव्हापासून धोकादायक वीजवाहिन्या हटवण्याची मागणी केली जात होती. अखेर महावितरण कंपनीला उशिराने का असेना पण जागी आली आहे. सोमवारपासून या परिसरातील धोकादायक ठरत असलेल्या वीजवाहिन्यांचे सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे. नागरिकांच्या रोषानंतर महावितरणने ४० वर्षांपूर्वीचे सात मीटर उंचीचे पिंजरा पोल हटवण्यास सुरुवात केली आहे. या ठिकाणी नऊ मीटर उंचीचे नवे पोल उभारले जात आहेत.









