रावेर शहरात दंड आकारणी, दंड न भरल्यास होणार गुन्हा दाखल
रावेर ( प्रतिनिधी ) : – वीज वितरण कंपनीच्या पाच पथकांनी शहरातील विविध कॉलन्यांमध्ये छापे मारुन त्यात १५ ते २० वीज चोरांना पकडून दंड आकारला असून दंड न भरल्यास वीज वितरण कंपनीच्या कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे येथील उप अभियंता नितीन सूर्यवंशी यांनी सांगितले.
वीज चोरी पकडण्याची मोहीम १७ जुलैला राबवण्यात आली. ही मोहीम कार्यकारी अभियंता गणेश महाजन यांच्या आदेशानुसार व उपकार्यकारी अभियंता नितीन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात राबवण्यात आली. या मोहिमेत देवेंद्र पाटील, सागर डोळे, सचिन आठवले, प्रसन्न पाटील, पंकज बाविस्कर व मुकेश ठाकरे या अभियंत्याचा सहभाग होता. ५ टीम तयार करुन प्रत्येक टीममध्ये ५ ते ६ कर्मचारी व त्यांच्यासोबत एक अधिकारी यांचा समावेश होता. ही मोहीम राबवण्यापूर्वी गुप्तता पाळण्यात आली.
अचानक वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी शहरात मोहीम राबवत असल्याने वीज चोरांचे धाबे दणाणले होते. या वेळी १५ ते २० वीज चोरी करणाऱ्यांवर कार्यवाही करण्यात आली. या कार्यवाहीत ज्या ग्राहकांना वीज चोरीचा दंड केला असून दंड न भरल्यास त्याच्याविरुद्ध विद्युत कायद्यानुसार यावल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात येईल. अशीच मोहीम आता ग्रामीण भागात ही राबवण्यात येणार असून किमान वर्षभर ही मोहीम सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.