भुसावळ (प्रतिनिधी) अतिवृष्टी, हमीभाव या संकटांचा सामना करत असतानाच शेतकऱ्यांवर आणखी एक संकट चालून आलं आहे. महावितरणच्या बेभरवशाच्या काराभारामुळं शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. शॉर्टसर्किटमुळं ऊसाच्या शेतात आग लागल्याच्या घटना राज्यभरात घडत आहेत. भुसावळ तालुक्यातील वेल्हाळा शेतशिवारातील १० एकरातील ऊस जळून खाक झाल्यामुळे ३ शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली आहे.ऊसतोडणीचा हंगाम चालू होण्याची लगबग असतांनाच या संकटामुळे पुन्हा परिसरातील शेतकरी संकटात सापडला आहे.
शॉर्ट सर्किटमुळं आग लागून १० एकर ऊस जळाल्याची घटना वेल्हाळा या गावात घडली आहे. ऊसाच्या तोडणीची लगबग सुरू झालेली असतानाच आज (दि. ११) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास आणि आशाबाई श्रीधर पाटील (गट ११२), रेशमी भूषण राणे (गट ११३), मधुकर चौधरी (गट ११४) यांच्या शेतातील इलेक्ट्रिक डीपीला आग लागली. त्यामुळे बघता बघता १० एकरातील ऊस जळून खाक झाला. जोरदार वाऱ्यामुळे आग अधिक पसरली.
आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत ही आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र वाऱ्यामुळं आग अधिक पसरत असल्यामुळे गावकऱ्यांनी अग्निशमन दलाशी संपर्क साधला परंतु तोपर्यंत बघता बघता १० एकरवरील ऊस जळून खाक झाला होता. या आगीत साधारण १० लाखांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान, महावितरणचे धनंजय धांडे, कविता सोनवणे तर तलाठी बाळासाहेब गायकवाड यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला.