भगवान महावीर जन्मकल्याणक समिती अध्यक्ष पारस राका यांची माहिती
जळगाव (प्रतिनिधी) – सकल जैन श्री संघ जळगाव प्रणित श्री सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समिती – २०२४ द्वारा १८ ते २२ एप्रिल २०२४ दरम्यान शासनपती श्रमण भगवान महावीर स्वामीजींचा २६२३ जन्म कल्याणक महोत्सव साजरा करण्याचे नियोजन केले आहे. या निमित्त शहरात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन झालेले असून या वर्षाच्या या महोत्सवाची विशेष गोष्ट अशी आहे की, महावीर जन्मकल्याणकला २१ एप्रिल रोजी जळगाव येथील खान्देश सेंट्रल प्रांगणात सकाळी ९.४५ वाजता पद्मभूषण आचार्य भगवंत प.पू. विजय रत्नसुंदर सुरीश्वरजी म.सा. यांची विशेष उपस्थिती व उद् बोधन लाभणार आहे. याबाबतची माहिती पारस राका (अध्यक्ष, भगवान महावीर जन्मकल्याणक समिती – २०२४) स्वाध्याय भवन येथे आयोजलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
१९ रोजी सकाळी ६.३० ला सिव्हिल हॉस्पीटल येथे स्वाध्याय महिला मंडळ व सुशिल बहू मंडळ द्वारा फळ वाटप व सकाळी ७.१५ वाजता ‘ट्रेझर हंट’ स्पर्धा खान्देश सेंट्रल येथे होईल. या स्पर्धेसाठी आधी नाव नोंदणी करणे आवश्यक असून त्यात सकल जैन समाजातील १६ ते ५० वर्षांच्या युवक-युवतीत, स्त्री-पुरुष, विवाहीत-अविवाहीत व्यक्ती सहभागी होऊ शकतील. जळगाव जैन युथ पॉवर (JJYP) हे आयोजक आहेत. सायंकाळी ७.०० ला श्री सकल जैन भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव समिती २०२४ द्वारा छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह येथे विविध स्पर्धांचा पुरस्कार वितरण सोहळा, तर याच ठिकाणी सायंकाळी ०७.३० पासून ‘लुक एन लर्न’ तथा अन्य महिला मंडळा तर्फे वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमाची प्रस्तुती होईल.
२० एप्रिल रोजी सकाळी ७.३० ते ८.३० स्वाध्याय भवन येथे सम्यक महिला मंडळा तर्फे सामूहिक सामायिक मध्ये ‘प्रभू महावीर: कल, आज और कल’ या विषयावर वक्ते आदर्श जैन यांचे मनोगत होईल. दुपारी २.०० ते सायंकाळी ७.०० पर्यंत खान्देश सेंट्रल प्रांगण येथे वीरति वृंद द्वारा कार्निवल, सायंकाळी ७.०० ला श्री सकल जैन भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव समिती २०२४ द्वारा स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह येथे होईल. या कार्यक्रमानंतर ७.३० पासून सदाग्यान भक्ती मंडळ, अन्य महिला मंडळाद्वारे लगेच विविध नाविण्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमांची प्रस्तुती होईल.
२१ एप्रिल रोजी महावीर जन्मकल्याणक दिनी सकाळी ७.१५ वाजता शहरातील श्री वासुपुज्यजी जैन मंदीर प्रांगण येथे सकल श्री संघाद्वारे जैन ध्वजवंदन होईल. तेथूनच सकाळी ७.३० वाजता जैन युवा फाउंडेशन द्वारा आयोजित भव्य अशा शोभायात्रेस (वरघोडा) आरंभ होईल. टॉवर चौक, गांधी मार्केट, सुभाष चौक, दाणाबाजार, सारस्वत चौक, जयप्रकाश नारायण चौक, नेहरू चौक मार्गे खान्देश सेंट्रल प्रांगणात समापन होईल. सकाळी जय आनंद ग्रुप तर्फे ८.४५ पासून आयोजित रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन आहे. सकाळी ९.०० वाजता जैन ध्वजवंदना व मुख्य समारंभास सुरुवात होईल. सकाळी ९.४५ वाजता आचार्य भगवंत पद्मभूषण प.पू. विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज यांचे विशेष प्रासंगीक उद् बोधन लाभेल. सकाळी ११.१५ ला सामुहीक प्रसादी असून त्याचे लाभार्थी श्रीमती कांताबाईजी इंदरचंदजी छाजेड परिवार आहे. सायंकाळी ७.३० वाजेपासून वीतराग भवन, लाल मंदीर शिवाजी नगर येथे महावीर दिगंबर चैत्यालय ट्रस्ट द्वारा भगवान महावीर स्वामी झुला उत्सव होईल.
महावीर जन्मकल्याण निमित्ताने जैन इरिगेशन तर्फे काव्य रत्नावली चौकाची सजावट करण्यात येणार असून व.वा. वाचनालयाच्या प्रांगणात गरजूंसाठी भोजन देण्यात येणार आहे. या सोबतच विविध संस्थां तर्फे शहरातील विविध चौक सुशोभित केले जाणार आहेत. सर्व कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे विनम्र आवाहन भगवान महावीर जन्मकाल्याक समितीचे अध्यक्ष श्री पारस राका यांनी केले.
२२ एप्रिल रोजी आचार्य भगवंत प.पू. १००८ श्री रामलालजी म.सा. यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने सकाळी ७ वाजता समता युवा संघा तर्फे सिव्हिल हॉस्पीटल मध्ये रुग्णांसाठी फळ वाटप, १०.३० ते ११.०० साधुमार्गी जैन संघा द्वारे स्वाध्याय भवन येथे नवकार महामंत्र जापने या महोत्सवाचा समारोप होणार आहे.
या कार्यक्रमासाठी माजी मंत्री समाजरत्न, समाज चिंतामणी सुरेश दादा जैन त्याच प्रमाणे सकल जैन श्री संघ अध्यक्ष दलीचंदची जैन यांचे मार्गदर्शन असून सन्माननीय अतिथी म्हणून मा. खा. ईश्वरबाबुजी ललवाणी, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, नयनतारा बाफना, माजी महापौर रमेशदादा जैन, उद्योगपती रजनीकांत कोठारी, माजी महापौर प्रदीप रायसोनी, उद्योगपती अजय ललवाणी, गौतम प्रसादी लाभार्थी कांताबाई इंदरचंदजी छाजेड प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असतील. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कस्तुरचंदजी बाफना (कार्याध्यक्ष, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ), ललित लोडाया (अध्यक्ष, श्री जैन श्वेतांबर मूर्तीपुजक संघ), राजेश जैन (अध्यक्ष, श्री महावीर दिगंबर जिनतैत्यालय ट्रस्ट), जितेंद्र चोरडिया (अध्यक्ष, श्री. जैन श्वेतांबर तेरापंथ सभा) श्री. स्वरुपभाई लुंकड यांचे मोलाचे योगदान लाभत आहे. यावेळी श्रेयस कुमट, अनिल जोशी, किशोर कुलकर्णी, अनिल कोठारी उपस्थित होते.