भाजपमधून तीव्र रोष, स्थानिक कार्यकर्त्यांना संधी देण्याची मागणी
नाशिक ( प्रतिनिधी ) – मंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यपद्धतीवर भाजपमधून तीव्र रोष प्रगट होत असून विविध पक्षातून भाजपमध्ये येणाऱ्या व्यक्तींच्या प्रवेशाला नाशिक मध्यच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी कडाडून विरोध केला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराला उधाण आले असून भाजपने शिवसेना ठाकरे गटासह काँग्रेसला खिंडार पाडण्याचे सत्र सुरू ठेवले आहे.

राज्यात महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती जाहीर केल्यानंतर आनंदोत्सवात सहभागी झालेले ठाकरे गटाचे नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे आणि माजी महापौर यतिन वाघ यांनी दुसऱ्याच दिवशी भाजपचा रस्ता पकडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
काँग्रेसचे माजी स्थायी सभापती शाहू खैरे हे देखील भाजपच्या वाटेवर आहेत. भाजपचे संकटमोचक तथा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकारातून हे प्रवेश घडत असून याबाबत स्थानिक आमदारांशी चर्चा केली गेली नाही, यामुळे नाराजी पसरली आहे. आगामी निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाशी युतीबाबत चर्चा सुरू ठेवत भाजपने ज्या, ज्या प्रभागात पक्षाकडे तुल्यबळ उमेदवार नाही, तिथे विरोधी पक्षातील मोहरे आपल्याकडे खेचण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. यातून प्रभाग क्रमांक १३ मधील काँग्रेसचे माजी नगरसेवक शाहू खैरे, ठाकरे गटाचे माजी महापौर विनायक पांडे, माजी महापौर यतीन वाघ आणि माजी स्थायी सभापती संजय चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जाते.
माजी महापौर पांडे व वाघ हे स्वत निवडणुकीत उतरणार नसून कुटुंबातील सदस्यांना संधी देणार आहेत. गुरुवारी हे प्रवेश होणार असल्याचे समोर आल्यानंतर भाजपमधून तीव्र पडसाद उमटले. नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे यांनी प्रभाग १३ मध्ये होणाऱ्या या प्रवेशाला कडाडून विरोध दर्शविला. प्रस्थापितांच्या विरोधात ठामपणे लढा देणाऱ्या हिंदुत्ववादी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभी आहे. या प्रवेशाबाबत निवडणूक प्रमुख म्हणून मला कुठलीही विचारणा करण्यात आलेली नाही असे आमदार फरांदे यांनी स्पष्ट केले.
विरोधी पक्षातील या नेत्यांना घेण्यास भाजपमधून कडाडून विरोध सुरू झाला. इच्छुकांसह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात धाव घेत पक्ष प्रवेशाला विरोध केला. घोषणाबाजी केली. कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी यापूर्वी स्थानिक लोकप्रतिनिधींना अंधारात ठेवत विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला आहे. नाशिक पश्चिममध्ये ठाकरे गटाच्या ज्या सुधाकर बडगुजर यांना पराभूत केले होते, त्यांनाही भाजपमध्ये प्रवेश देताना कुणाला कल्पना दिली गेली नव्हती. बडगुजर यांच्या प्रवेशावेळी जसे संतप्त पडसाद उमटले, तशीच परिस्थिती आताही निर्माण झाली आहे.









