जळगाव शहरातील १०० फुटी रस्त्यावरील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील शिव कॉलनीकडील १०० फुटी रस्त्यावर बुधवारी दि. १५ मे रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये तुफान हाणामारीची घटना घडली आहे. या प्रकरणी एकमेकांच्याविरुध्द रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये अल्पवयीन मुलांसह एकूण चार मुलांचा समावेश आहे.
आशाबाबानगर भागातील एका अल्पवयीन मुलाचा काही दिवसांपुर्वी हरिविठ्ठल नगरातील मुलांशी वाद झाला होता. हा वाद मिटविण्यासाठी बुधवारी रात्री ९.३० वाजता शंभरफुटी रस्त्यावर काही मुलं जमले होते. मात्र, या ठिकाणी वाद न मिटवता दुसऱ्या वादाला सुरुवात झाली. या वादात मुलांच्या दोन्ही गटांकडून एकमेकांवर लोखंडी धारदार वस्तुने मारहाण करण्यात आली. एका विद्यार्थ्याच्या छातीवर मारहाण करण्यात आली. तर दुसऱ्या मुलाच्या कानालगतच्या भागावर मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, आशाबाबानगर भागातील मुलाने दिलेल्या फिर्यादीवरुन हरिविठ्ठल नगरातील तीन मुलांवर तर हरिविठ्ठल भागातील मुलांनीही आशाबाबानगरातील मुलाविरुध्द रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुनील पाटील हे करत आहेत.