महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा कार्यकारिणीची भुसावळ येथे बैठक उत्साहात
जळगाव ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जळगाव जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक रविवार, १८ जानेवारी रोजी भुसावळ येथील प.क. कोटेचा महाविद्यालयात उत्साहात पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील सहा शाखांमधील २७ कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवून आगामी काळातील संघटनात्मक बांधणी आणि उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा केली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शोभा बोऱ्हाडे आणि रवींद्र चौधरी यांनी प्रेरणादायी गीते सादर केली. त्यानंतर जिल्हा कार्याध्यक्ष प्रल्हाद बोऱ्हाडे यांनी बैठकीचे प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. या प्रसंगी राज्य निरीक्षक म्हणून राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे आणि वैज्ञानिक जाणीवा प्रकल्पाचे राज्य कार्यवाह प्रा. दिगंबर कट्यारे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. कट्यारे यांनी राज्य कार्यकारिणी बैठकीचा सविस्तर अहवाल सादर केला, तर सुरेश बोरसे यांनी राज्य पातळीवर घेतलेल्या निर्णयांची माहिती देऊन त्यावरील अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन केले.
या बैठकीत चोपडा, भडगाव, जळगाव, पाचोरा, भुसावळ आणि जामनेर या शाखांच्या प्रतिनिधींनी आपल्या कामाचा प्रगती अहवाल सादर केला. जिल्हा कार्यकारिणीने यावेळी महत्त्वपूर्ण निर्णय घेताना ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने सभासद नोंदणी वाढवण्यावर भर दिला आहे. तसेच नोंदणी झालेल्या नवीन कार्यकर्त्यांना तातडीने कार्यात सामावून घेण्याचे ठरवण्यात आले. संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी जिल्हा कार्याध्यक्ष आणि प्रधान सचिवांनी १० फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील सर्व शाखांची कार्यकारिणी निवड पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
सामाजिक प्रबोधनासाठी आगामी चार महिन्यांत विविध उपक्रम राबवण्याचे नियोजन करण्यात आले असून, विशेषतः विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी ‘विज्ञान महोत्सव’ हा कार्यक्रम किमान ५० विद्यालयांमध्ये प्रभावीपणे राबवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या बैठकीस जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र बावस्कर, ज्येष्ठ कार्यकर्ते अरुण दामोदर, जिल्हा प्रधान सचिव रवींद्र चौधरी, प्रा. दीपक मराठे, शोभा बोराडे, सुमंगल अहिरे, प्रा. निलेश गुरुचल, निरंजना तायडे, प्रेम परदेशी, अशोक भालेराव, नरेश वाघ, विजय साळवे, सिद्धार्थ सोनवणे, अय्युब पिंजारी, मिथुन डिवरे, मिनाक्षी चौधरी, बी.आर. पाटील, भीमराव दाभाडे, रमेश गायकवाड आणि युनूस खान यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप आणि उपस्थितांचे आभार मानसिक आरोग्य विभागाचे राज्य सहकार्यवाह विश्वजीत चौधरी यांनी मानले.









