विज्ञान, निर्भयता, नीतीच्या विचारांची भडगावातून नवी सुरुवात
भडगाव ( प्रतिनिधी ) – समाजात अंधश्रद्धा, बुवाबाजी, चमत्कारांच्या नावाखाली होणारी फसवणूक आणि अवैज्ञानिक प्रथा आजही विविध स्वरूपात अस्तित्वात आहेत. या प्रवृत्तींना ठामपणे विरोध करत वैज्ञानिक दृष्टिकोन, निर्भय विचार आणि नैतिक मूल्यांचा प्रसार करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) भडगाव शाखेची कार्यकारणी २०२६ जाहीर करण्यात आली आहे. नव्या कार्यकारणीच्या माध्यमातून भडगाव तालुक्यात व्यापक जनजागृती, प्रबोधन आणि प्रशिक्षणात्मक उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.


अंनिस ही केवळ संघटना नसून ती विवेकवादी चळवळ आहे. अंधश्रद्धांमुळे समाजातील सामान्य नागरिकांचे आर्थिक, मानसिक व शारीरिक शोषण होते. भीती, अज्ञान आणि अंधविश्वास यांचा फायदा घेत काही प्रवृत्ती नागरिकांची दिशाभूल करतात. याच पार्श्वभूमीवर विज्ञानाधिष्ठित विचार, प्रश्न विचारण्याची सवय आणि मानवतावादी दृष्टिकोन समाजात रुजवणे, हा अंनिसच्या कार्याचा गाभा आहे. भडगाव शाखेची नवी कार्यकारणी या उद्दिष्टांना अधिक व्यापक स्वरूप देणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
नव्या कार्यकारणीत विविध सामाजिक, शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. शाखाध्यक्षपदी श्री. युनुस खान महेबुब खान यांची निवड करण्यात आली असून, उपाध्यक्ष म्हणून प्रा. लक्ष्मण ग्यानोबा कांबळे यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. कार्याध्यक्षपदी श्री. शामकांत दयाराम पाटील, तर प्रधान सचिव म्हणून प्रा. डॉ. दिनेश हरीभाऊ तांदळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संघटनेच्या कामकाजाला अधिक प्रभावी करण्यासाठी विविध विभागांची रचना करण्यात आली आहे. विविध उपक्रम विभागाची जबाबदारी श्री. सुबोध युवराज पाटील यांच्याकडे देण्यात आली असून, वैज्ञानिक जाणीव शिक्षण प्रकल्प व बुवाबाजीविरोधी संघर्ष विभागाची धुरा श्री. योगेश सुभाष शिपी सांभाळणार आहेत. प्रशिक्षण व्यवस्थापन विभागासाठी पत्रकार श्री. जावेद शेख अब्दुल सत्तार यांची निवड करण्यात आली आहे.
विवेक जागर या उपक्रमांतर्गत प्रकाशने व वितरणाची जबाबदारी प्रा. डॉ. अविनाश नामदेव भंगाळे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका व निधी व्यवस्थापन विभागाची जबाबदारी श्री. फिरोज रज्जाक शेख यांच्याकडे देण्यात आली असून, संघटनात्मक सहकार्यासाठी श्री. संजय गोसावी सक्रिय भूमिका बजावणार आहेत.
महिला सहभाग वाढविण्यासाठी करिमा खान मॅडम यांच्याकडे विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. युवकांना विवेकवादी चळवळीकडे आकर्षित करण्यासाठी युवा सहभाग विभागाची जबाबदारी श्री. स्वप्निल सुभाष सोनार यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. सांस्कृतिक अभिव्यक्ती विभागाची धुरा श्री. रविंद्र सूर्यवंशी सांभाळणार असून, कायदेविषयक सल्लागार म्हणून श्री. हर्षल भदाणे मार्गदर्शन करणार आहेत.
नव्या कार्यकारणीच्या माध्यमातून शाळा व महाविद्यालयांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित व्याख्याने, अंधश्रद्धा व बुवाबाजीविरोधी प्रात्यक्षिके, प्रशिक्षण शिबिरे, कायदेविषयक जनजागृती, तसेच महिला व युवकांसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करणे आणि फसवणुकीला बळी पडणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन व मदत मिळवून देणे, हेही महत्त्वाचे उद्दिष्ट असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
विवेक, विज्ञान आणि माणुसकीच्या आधारावर भीतीमुक्त समाजनिर्मिती करणे, हा अंनिसचा मूलमंत्र आहे. भडगाव तालुक्यातील नागरिकांनी या चळवळीत सक्रिय सहभाग घ्यावा आणि अंधश्रद्धामुक्त, प्रगल्भ समाज घडविण्यास हातभार लावावा, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, भडगाव शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.









