राज्यभरातून हजारपेक्षा अधिक कार्यकर्ते राहणार उपस्थित
पुणे (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ३५ वर्षपूर्ती निमित्त दोनदिवसीय अधिवेशन जिल्ह्यातील आळंदी येथे शनिवार दि. २८ व २९ डिसेंबर रोजी घेण्यात येत आहे. दोन्ही दिवसात विविध सत्रांमध्ये कार्यकर्त्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर स्थापित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि विवेक जागर संस्था आयोजित महाराष्ट्र अंनिसच्या ३५ वर्षपूर्ती राज्य अधिवेशन हे आळंदी येथील मुंबई मराठा फ्रुट मार्केट धर्मशाळा येथे घेण्यात येत आहे. अधिवेशनाचे उद्घाटन सकाळी साडेनऊ वाजता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते होणार असून प्रमुख उपस्थिती राज्याचे अध्यक्ष अविनाश पाटील यांची आहे. तर अध्यक्षस्थानी राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे राहतील. त्यानंतर सकाळी ११ वाजता प्रथम सत्रात ‘समितीच्या ३५ वर्षातील कृतीशील वाटचाल’ ज्येष्ठ कार्यकर्त्या सुशीला मुंडे विशद करतील. अध्यक्षस्थानी प्रा. शामराव पाटील आहेत.
दुपारी साडेबारा वाजता ‘मन:स्वास्थ्य ते समाजस्वास्थ्य’ या परिसंवादात कार्यकर्त्यांच्या मानसिक आरोग्याविषयी जळगाव येथील डॉ. प्रदीप जोशी आणि पनवेल येथील डॉ. अनिल डोंगरे हे मार्गदर्शन करणार आहेत. अध्यक्षस्थानी रत्नागिरी येथील डॉ. प्रदीप पाटकर उपस्थित राहतील. दिवसभरातील तृतीय सत्रात ‘वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आजची आव्हाने’ या विषयावर दुपारी ३ वाजता डोंबिवली येथील प्रा. मच्छिंद्रनाथ मुंडे, सांगली जिल्ह्यातील प्राचार्य डॉ. नितीन शिंदे, पुणे येथील उत्तम जोगदंड हे विचार मांडतील. सत्राच्या अध्यक्षस्थानी माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर आहेत.
चतुर्थ सत्रात कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांचे प्रातिनिधिक अनुभव कथन होणार आहे. यावेळी अशोकभाई शहा यांची प्रमुख उपस्थिती असून अध्यक्षस्थानी राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे आहेत. यानंतर संध्याकाळी ६ वाजता विशेष पुरस्कार वितरण होणार आहेत. रात्री ९ वाजता कार्यकर्त्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. द्वितीय दिवशी रविवार दि. २९ डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता प्रथम परिसंवादात ‘संत आणि समाजस्थिती : काल, आज, उद्या’ या विषयावर चोपदार महाराज आणि ज्ञानेश्वर बंडगर हे विचार मांडणार असून अध्यक्षस्थानी शामसुंदर सोन्नर महाराज यांची उपस्थिती राहणार आहे.
त्यानंतर १० वाजता युवा संवादाच्या सत्रात मुंबई येथील नंदना गजभिये, नंदुरबार येथील वसंत वळवी, नागपूर येथील कविता मते, नांदेड येथील तुळशीदास शिंदे, पनवेल येथील प्रियंका खेडेकर हे कार्यकर्ते सहभागी होणार असून त्यांच्याशी डॉ. माधुरी झाडे व कृष्णात कोरे हे संवाद साधणार आहेत.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा भविष्यवेध घेण्यासाठी पनवेल येथील आरती नाईक आणि शहादा येथील विनायक सावळे हे विचार मांडतील. अध्यक्षस्थानी संजय बनसोडे उपस्थित राहतील. दुपारी १ वाजता समारोपाला ज्येष्ठ लेखक उत्तम कांबळे असून अध्यक्षस्थानी राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे राहतील. अधिवेशनाला राज्यभरातून ११०० कार्यकर्त्यांची नोंदणी झाली असून त्यासाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. या समित्यांच्या माध्यमातून अधिवेशनाची तयारी पूर्ण झाली आहे.