एकनाथ खडसे यांच्या जमिनी हस्तांतराची चौकशी व जमीन परत देण्याची मागणी
जळगाव ( प्रतिनिधी ) – भुसावळ तालुक्यातील मानपुर शिवारातील महार वतनाच्या जमिनी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी “साखर कारखाना उभारणी”चे कारण देत स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा आरोप करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य आंदोलन करण्यात आले. या वेळी पक्षाचे महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले.

आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी ढगे यांना निवेदन सादर करून संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून बेकायदेशीर जमिनी हस्तांतरण रद्द करावे आणि जमिनी मूळ वतनदारांच्या नावे परत द्याव्यात, अशी मागणी केली. तसेच या प्रकरणात संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली.
या वेळी प्रताप बनसोडे, राजेश साळुंखे, किरण अडकमोल, उज्वला अडकमोल, मंगला कुमावत, रेखा अहिरे, शंकर सोनवणे, हरिष शिंदे यांच्यासह महिला–पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाने निवेदन स्वीकारून आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.









