जामनेर तालुक्यातील पहूर येथील घटना : जळगावात उपचार सुरू
जामनेर / जळगाव (प्रतिनिधी) : पाचोरा रस्त्यावर असलेल्या १३२ के. व्ही. उपकेंद्रातील ३३ के. व्ही. विभागात कंत्राटी कर्मचारी काम करताना विजेच्या पुरवठा झोनमध्ये आल्याने अपघात होऊन गंभीररीत्या भाजला गेल्याची घटना शुक्रवारी दिनांक ५ जुलै रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. या कर्मचाऱ्यावर जळगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दामोदर पुंजाजी लोखंडे (वय ४०, रा. नाशिक) असे या जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे. लोखंडे हे १३२ के.व्ही. उपकेंद्रात देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटी कर्मचारी म्हणून करतात. कामानुसार ते नाशिक वरून जिल्ह्यातील विविध ठिकाणी कामानिमित्त ये-जा करीत असतात. शुक्रवारी ३३ के. व्ही. विभागात दुपारी १२ वाजेच्या सुमारास देखभाल-दुरुस्तीचे काम करीत असताना ते विजेच्या झोनमध्ये आल्याने संबंधित विजेच्या उपकरणाला धक्का लागला. त्यात लोखंडे हे विजेचा धक्का लागून जखमी झाले.
त्यांना आजूबाजूच्या नागरिकांनी जामनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी राहुल निकम यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
३३ के.व्ही. मध्ये विजेचा पुरवठा बंद करून संबंधित कर्मचारी काम करीत असताना अॅल्युमिनियमची शिडी घेऊन जात असताना तो विरुद्ध दिशेला गेला. त्यामुळे घटनास्थळी भाजला गेला आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती महापारेषणाचे उपकार्यकारी अभियंता विकास विभांडिक यांनी दिली आहे.