जळगाव ( प्रतिनिधी ) – महापालिकेच्या काल झालेल्या महासभेत तोडीपानी , भ्रष्टाचाराचे झालेले आरोप – प्रत्यारोप आणि राष्ट्रगीताच्या अवमानाबद्दल जे दोषी थरातील त्यांच्यावर कारवाई करा अशा मागणीचे निवेदन आज महानगर राष्ट्रवादीने महापौर , आयुक्त व पोलीस अधीक्षकांनाही दिले .
या निवेदनात म्हटले आहे की , कालच्या महासभेत उपमहापौर आणि भाजप नगरसेवकांनी एकमेकांवर तोडीपानी , भ्रष्टाचाराचे आरोप – प्रत्यारोप केले आहेत आणि राष्ट्रगीताचा अवमान केला आहे . भाजपचे नगरसेवक व नगरसेविका आणि त्यांचे कुटुंबीय यांनी उपमहापौरांना धक्काबुक्की करीत धमकावले. उपमहापौरांच्या दिशेने मंचावर धावत गेले आहेत. महासभेत फक्त नगरसेवक , महापालिकेतील अधिकारी आणि महापौर व आयुक्तांच्या परवानगीने नागरिकांना उपस्थित राहता येते . मात्र हे नियम गुंडाळून महासभेत गुंडागर्दी करण्यात येत होती . या लाजिरवाण्या घटनांमध्ये महासभेत शासनाचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेले आयुक्तांनी हस्तक्षेप करणे अपेक्षित होते . गुंडागर्दी पाहून पोलिसांना सभागृहात पाचारण करण्यात आले .
या सर्व घटनांची आणि राष्ट्रगीताच्या अवमानाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसकडून शहरात आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे . या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँड रवींद्रभैय्या पाटील , महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी , जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील , अमोल कोल्हे , दिलीप माहेश्वरी , माजी नगरसेवक सुनील माळी , नईम खाटीक , माजी नगरसेवक राजू मोरे , राहुल टोके , माध्यम प्रमुख सलीम इनामदार , अल्पसंख्यांक महानगराध्यक्ष डॉ रिझवान खाटीक आदींच्या सह्या आहेत.