जळगाव राष्ट्रीय लोकअदालतीचे यश
जळगांव (प्रतिनिधी) :- येथील जिल्हा व सत्र न्यायालय येथे आयोजीत राष्ट्रीय लोकअदालतमध्ये एका मोटर अपघात दाव्यामध्ये चर्चेअंती अर्जदारांना नुकसान भरपाई पोटी ४३ लाख रूपये देण्याचे आदेश एच.डी.एफ.सी. जनरल इंश्युरंन्स विमा कंपनी यांना देण्यात आले.
जळगांव शहर महानगर पालिका येथे सफाई कर्मचारी म्हणुन नोकरीला असणारे रेहानाबी तस्लीम शेख (वय ४२ वर्ष रा. शिवाजी नगर जळगांव) यांचा दि. २६ एप्रिल २०२० रोजी अजिंठा चौफुली कडुन कालींकामाता मंदीराकडे जाताना त्यांची हिरो प्लेझर स्कुटी कं. MH-19-BT-9974 ने जात असतांना अपघात झाला होता. त्याना पाठीमागुन येणारी ट्रक कं, MH-15-BG-7856 या ट्रकने जोरात धडक दिली.
सदर अपघातामध्ये वाहन चालवत असलेली रेहाना तस्लीम शेख व तिच्या कुशीत असलेला ४ वर्षाचा नातु हा ट्रकच्या मागील चाकामध्ये येवुन आजी व नातु यांचा घटनास्थळावर मृत्यु झाला. सदर अपघाती मृत्युनंतर मयत यांचे वारसांनी मागुन धडक देणाऱ्या ट्रक चालक व मालक, विमा कंपनी विरूध्द नुकसान भरपाई मिळणे कामी जळगांव येथील मोटार अपघात दावा प्राधिकरण यांच्या समक्ष अँड. महेंद्र सोमा चौधरी यांचे मार्फत नुकसान भरपाई दावा दाखल करण्यात आला.
सदरचा सामनेवाला ट्रक हा विमाकृत असल्याने सामनेवाला ट्रकचा चालक, मालक व त्यांची एच.डी.एफ.सी. जनरल इंश्युरंन्स विमा कंपनी यांच्या विरूध्द दावा दाखल करण्यात आला. विमा कंपनीतर्फे अँड. जयंत फडके यांनी कामकाज पाहीले. सदर प्रकरण हे साक्षीपुराव्याच्या पायरीवर असतांना जळगांव शहर महानगरपालिका येथिल अकाउन्ट विभागातील कर्मचारी यांना मयताचे उत्पन्न सिध्द करण्यासाठी कोर्टाने समंस काढले होते. मयताचे उत्पन्न हे साक्षी पुराव्यादरम्यान सिध्द होताच नुकसान भरपाईची आकडेवारी सरासरी कीती होऊ शकते याचा अंदाज घेत प्रकरणाला कोणताही विलंब न लावता लोकन्यायालयाच्या माध्यमातुन सदर प्रकरणात 43 लाख रूपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश लोकन्यायालयाचे अध्यक्ष यांनी विमा कंपनीस केला.
सर्वोच्च न्यायालयाच्या ठरलेल्या धोरणानुसार नुकसान भरपाईची आकडेवारी व सरासरी चर्चेअंती ठरलेली आकडेवारी ही सारखीच येत असल्याने सदरच्या प्रकरणात मनपा कर्मचारी रेहानाबी तस्लीम शेख यांच्या वारसांना ४३ लाख व तिच्या सोबत प्रवास करत असलेला तिचा ४ वर्षाचा नातु याला ४ लाख ५० हजार रूपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश विमा कंपनीला लोकन्यायालयाच्या अधिकृत पॅनलचे अध्यक्ष न्यायमुर्ती श्रीमती. एस. एन. मोरवाले यांनी योग्य ते आदेश पारित करत नुकसान भरपाईची रक्कम पक्षकाराला स्वाधीन केली. सदर प्रकरणात अर्जदारातर्फे अँड. महेंद्र सोमा चौधरी, अँड. श्रेयस महेंद्र चौधरी अँड. हेमंत आर. जाधव, अँड. सुनिल चव्हाण, यांनी कामकाज पाहीले.