अधिपत्र बजावलेल्या मालमत्तांच्या लिलाव २२ डिसेंबरला
जळगाव (प्रतिनिधी) :- महापालिकेने ४ डिसेंबर ते १९ डिसेंबर २०२३ या कालावधीत शंभर टक्के शास्ती माफीची योजना घोषित केलेली आहे. योजनेस पहिल्या दोन दिवसांत नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. यात तब्बल एक कोटी रुपये भरणा झालेला आहे. यात ११ लाख रुपये ऑनलाइन भरणा झाला आहे. कर भरण्यासाठी नागरिक प्रभाग समितीत गर्दी करत आहेत. यात थकीत मालमत्ताधारकांना ३० ते ६० टक्के रक्कम पर्यंतचा फायदा होत आहे. ही योजना फक्त मर्यादित कालावधीसाठी आहे. सर्व थकीत कर मालमत्ताधारकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, अन्यथा २२ डिसेंबरला अधिपत्र बजावलेल्या मालमत्तांच्या लिलाव केला जाणार आहे.
महापालिकेतर्फे गेल्या अनेक वर्षापासून घरपट्टीची थकबाकी असणाऱ्यांना अंतीम लिलाव नोटीस बजावण्यात आली आहे. २२ डिसेंबरला लिलाव होणार आहे. त्या अगोदर त्यांना ‘अभय शास्ती’ योजना लागू केली आहे. या अंतर्गत दोन दिवसात तब्बल एक कोटीची थकबाकी वसुली झाली आहे. अनेक नागरिकांनी आमदार सुरेश भोळे यांना प्रत्यक्ष भेटून शास्तीमाफी योजना राबवावी अशी मागणी त्यांच्याकडे केली. आमदार यांनी मालमत्तांच्या लिलाव करण्यापूर्वी एक संधी म्हणून अभय शास्ती योजना राबविण्याची विनंती पत्राद्वारे आयुक्त विद्या गायकवाड यांच्याकडे केली.
अभय शास्ती योजनेच्या कालावधीत शनिवार, रविवारीही प्रभाग समिती कार्यालय सुरू राहणार असून भरणा स्वीकारला जाणार आहे. याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जळगाव महापालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.