जळगाव ( प्रतिनिधी ) – कृषिपंपाच्या वीजबिलातील थकबाकीत ६६ टक्के सूट मिळविण्याची संधी महा कृषी ऊर्जा अभियानात आहे. जळगाव परिमंडलातील साडेतीन लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या मूळ थकबाकीमधील जवळपास १९०० कोटी रुपये माफ करण्यात आले आहेत. या शेतकऱ्यांनी चालू वीजबिल व सुधारित थकबाकीपैकी ५० टक्के रकमेचा मार्च २०२२ पर्यंत भरणा केल्यास आणखी १७८९ कोटी रुपयांची माफी मिळणार आहे.
थकबाकीमुक्ती योजनेत सहभाग न घेणाऱ्या व चालू वीजबिलांचाही भरणा न करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा नाईलाजाने खंडित करण्याची कारवाई करण्यात येत आहे. महावितरणवरील आर्थिक संकट गंभीर असल्यामुळे शेतकऱ्यांनी किमान चालू वीजबिलांचा भरणा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या या अभियानात जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील ३ लाख ६४ हजार १७३ शेतकऱ्यांकडे ५ हजार ४२२ कोटी ४४ लाख रुपयांची मूळ थकबाकी होती. त्यातील १८९९ कोटी १७ लाख रुपये महावितरणकडून निर्लेखन तसेच विलंब आकार व व्याजातील सवलतीद्वारे माफ करण्यात आले आहेत. वीजबिलांच्या दुरुस्तीद्वारे ५ कोटी ६१ लाख रुपये समायोजित करण्यात आले आहेत. आता या शेतकऱ्यांकडे ३५१७ कोटी ६६ लाख रुपयांची सुधारित थकबाकी आहे. मार्च २०२२ पर्यंत त्यातील ५० टक्के म्हणजे १७५८ कोटी ८३ लाख रुपये व चालू वीजबिलांचा भरणा केल्यास उर्वरित १७५८ कोटी ८३ लाख रुपयेही माफ करण्यात येणार आहेत.
आतापर्यंत जळगाव परिमंडलातील ९६ हजार ३६८ शेतकऱ्यांनी थकबाकीमुक्तीच्या योजनेत सहभाग नोंदविला आहे. जळगाव परिमंडलातील १६ हजार २२६ शेतकरी वीजबिलांच्या थकबाकीमधून मुक्त झाले आहेत. या शेतकऱ्यांकडे ८४ कोटी २५ लाख रुपयांची सुधारित थकबाकी होती. त्यांनी ११ कोटी ३५ लाख रुपये चालू वीजबिल व ५० टक्के थकबाकीचे ४२ कोटी १३ लाखांचा भरणा केला व वीजबिल कोरे केले. उर्वरित ५० टक्के थकबाकीचे ४२ कोटी १३ लाख रुपये माफ करण्यात आले आहेत.