धमकीत गांभीर्य नसल्याची एसपींची माहिती
जळगाव (प्रतिनिधी) : येथील विविध पोलीस स्टेशनला जिल्हाधिकाऱ्यांसह काही पोलीस अधिकारी यांना जीवे मारण्याची धमकी देणारे ई मेल मागील मार्च महिन्यात प्राप्त झाले होते. याबाबत सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धमकीच्या मेलमध्ये गांभीर्य नसल्याची माहिती देत पोलिसांचा तपास सुरु असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकारांना दिली आहे.
मार्च महिन्यात तीन वेगवेगळे मेल प्रशासनाला प्राप्त झाले होते. त्यात, काही अधिकाऱ्यांना मारू, जळगावात अशांतता पसरवू असा मजकूर लिहिला आहे. हे मेल आल्यानंतर जळगाव सायबर पोलिस स्थानकात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(केसीएन)जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने देखील असा मेल आलेला आहे. मात्र यात काही विशेष अस आढळून आले नाही, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी दिली आहे. मेल पाठवणारा व्यक्ती एकच असल्याचा संशय पोलिसांना मेलमध्ये लिहिलेल्या भाषेवरून आला आहे. शेवटचा मेल दि. २७ मार्च रोजी आला आहे.
या मेलची संपूर्ण चौकशी जळगाव पोलिसांच्या वतीने सुरू आहे. हा गंभीर प्रकार आहे, निश्चितपणे जळगाव पोलिसांच्या माध्यमातून मेल पाठविणाऱ्याची चौकशी करण्यात येईल अशी प्रतिक्रिया पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीदेखील पत्रकारांना दिली आहे.