जळगाव शहरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी)- शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या विसनजी नगरातील सुर्यवंशी हॉस्पिटल समोरून भरदिवसा शेतकऱ्याच्या मालकीचे २६ हजार रूपये किंमतीचे लोखंडी पत्रा आणि पाईप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे मंगळवारी १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संग्रामसिंह सुरेशसिंह सुर्यवंशी (वय-३८,रा. आदर्श नगर,जळगाव) यांचे विसनजी नगरातील सुर्यवंशी हॉस्पिटलसमोर असलेल्या जागेत त्यांच्या मालकीचे लोखंडी पाईप आणि पत्रे ठेवलेले होते. मंगळवारी १५ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने २६ हजार रूपये किंमतीचा लोखंडी पाईप व पत्रे चोरून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर संग्रामसिंह यांनी बुधवारी १६ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सलीम तडवी करीत आहे.