पाळधी ते तरसोद हायवे बायपासवर घटना
जळगाव (प्रतिनिधी):- दारूच्या नशेत असलेल्या एका ३० वर्षीय ट्रॅक्टर चालकाने भरधाव ट्रकखाली स्वतःला झोकून देऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पाळधी ते तरसोद हायवे बायपासवर घडली आहे. विशाल राजेंद्र बाविस्कर (रा. लिंगा, ता. नेपानगर, ह.मु. आसोदा) असे मृत तरुणाचे नाव आहे.


विशाल बाविस्कर हा तरुण पाळधी ते तरसोद बायपास रस्त्यावर ट्रॅक्टर घेऊन जात असताना त्याचा आणि समोरून येणाऱ्या एका टाटा पंच कारचा अपघात झाला. या अपघातानंतर विशाल हा दारूच्या नशेत असल्याने त्याठिकाणी टाटा पंचमधील व्यक्ती आणि विशालचे नातेवाईक जमा झाले. सर्वजण त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते. नातेवाईक समजावत असतानाच, विशालने अचानक समोरून येणाऱ्या एका ट्रक कंटेनरखाली स्वतःला झोकून दिले. या भीषण घटनेत गंभीर दुखापत झाल्याने विशालचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळै उडाली असून नातेवाईकांनी जळगाव जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती.
या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक विजय देवराम पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक शशिकांत श्रीराम पाटील हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.








