शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे ‘शरीरशास्त्र’ प्रदर्शन
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शालेय विद्यार्थ्यांना शरीरविज्ञानाची ओळख व्हावी याकरिता विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. मानवी शरीरातील विविध अवयवांची माहिती घेताना विद्यार्थ्यांमधील उत्सुकता वाढत होती.
महाविद्यालयातील शरीररचना शास्त्र विभाग, विद्यार्थी परिषद २०२५, सह्याद्री बॅच २०२२ यांच्या वतीने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला सकाळी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उदघाटन झाले. या वेळी उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे (पदव्युत्तर), डॉ. रमेश वासनिक (पदवीपूर्व), शरीररचना शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अब्दुल राफे, विद्यार्थी परिषद सचिव उदय नावरे तसेच विविध विभागप्रमुख उपस्थित होते. शहरातील विविध माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सकाळी १० वाजेपासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत या प्रदर्शनाला भेटी देऊन माहिती जाणून घेतली.
प्रदर्शनात शरीरविज्ञानाची ओळख महाविद्यालयाचे प्रथम व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी करून देत होते. यावेळी मानवी शरीरातील मेंदू, हृदय, यकृत, फुफ्फुस, जठर, स्वादुपिंड, किडनी, प्लिहा, हातापायांची हाडे, मांस, पेशी हे विद्यार्थ्यांना दाखवून त्याचे कार्य कसे चालते हे सविस्तरसांगण्यात आले. यावेळी मानवाचे शरीर काम कसे करते याची माहिती देताना विद्यार्थ्यांनी ‘नोट्स’ देखील काढल्या. एकंदरीतच मानवी शरीरात कोणत्या ठिकाणी कोणते अवयव कसे काम करतात ? त्यांना काम करण्यासाठी ऊर्जा कशी लागते याची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. प्रसंगी, नागरिकांनी विद्र्यार्थ्याना अभ्यासासाठी देह लागतो. त्याकरिता मरणोत्तर देहदान करावे. त्यासाठी शरीररचना शास्त्र विभागात संपर्क करावा असे आवाहन अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी केले.