वंदे भारत, अमृत भारत गाड्यांनी वाढवली कनेक्टिव्हिटी
मुंबई ( वृत्तसेवा ) – मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये प्रवासी वाहतुकीत मोठी कामगिरी बजावली असून, गेल्या वर्षभरात एकूण १६४.३० कोटी प्रवाशांनी मध्य रेल्वेने प्रवास केला आहे. सुरक्षितता आणि प्रवासी सेवेला प्राधान्य देत मध्य रेल्वेने ८.१६ लाख गाड्यांचे यशस्वी संचलन केले असून, प्रवासी संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत १.८४% वाढ नोंदवली आहे.


प्रवासी वाहतुकीचे महत्त्वाचे आकडे
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, एकूण प्रवाशांपैकी १४३.५८ कोटी प्रवाशांनी उपनगरीय (लोकल) सेवेचा लाभ घेतला, तर २०.७१ कोटी प्रवाशांनी मेल, एक्सप्रेस आणि पॅसेंजर गाड्यांमधून प्रवास केला. विशेष म्हणजे, मेल-एक्सप्रेस प्रवाशांच्या संख्येत ७.०८% ची लक्षणीय वाढ झाली आहे.
प्रमुख वैशिष्ट्ये आणि नवीन गाड्या
प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता, या आर्थिक वर्षात अनेक आधुनिक गाड्या सुरू करण्यात आल्या :
वंदे भारत एक्सप्रेस: पुणे – अजनी – पुणे (११ ऑगस्ट २०२५) ही नवीन वंदे भारत सुरू झाल्याने मध्य रेल्वेवरील एकूण वंदे भारत गाड्यांची संख्या आता ११ झाली आहे.
अमृत भारत एक्सप्रेस: एलटीटी-सहरसा आणि पनवेल-अलीपूरद्वार अशा दोन नवीन ‘अमृत भारत’ गाड्या सुरू करण्यात आल्या.
इतर गाड्या: हडपसर (पुणे) येथून जोधपूर, रिवा आणि मुजफ्फरपूरसाठी नवीन एक्सप्रेस गाड्या, तसेच साईनगर शिर्डी-तिरुपती एक्सप्रेस सुरू करण्यात आली.
लोकल प्रवाशांना दिलासा: वातानुकूलित सेवांत वाढ
मुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्यासाठी मध्य रेल्वेने २८ बिगर-वातानुकूलित सेवांचे एसी लोकलमध्ये रूपांतर केले आहे. यामुळे मुख्य मार्ग आणि हार्बर मार्गावरील एकूण एसी लोकल सेवांची संख्या आता ९४ वर पोहोचली आहे. तसेच उरण मार्गावर १० नवीन फेऱ्या वाढवल्याने या मार्गावरील एकूण सेवा ५० झाल्या आहेत.
गर्दीचे नियोजन करण्यासाठी मध्य रेल्वेने वर्षभरात १२,०३२ विशेष गाड्या चालवल्या. यात सर्वाधिक १७१२ गाड्या दिवाळी आणि छठ पूजेसाठी, तर उन्हाळी सुट्ट्यांसाठी १३५८ गाड्यांचा समावेश होता. कोकणवासीयांसाठी ३२६ गणपती विशेष गाड्या सोडण्यात आल्या होत्या.
पायाभूत सुविधांचा विस्तार
७ नवीन स्थानके: मुंबई उपनगरीय विभागात गव्हाण आणि तारघर, तर अमळनेर-बीड मार्गावर ५ नवीन स्थानके सुरू झाली आहेत.
वेग मर्यादा: ७७ जोड्यांच्या रेल्वेगाड्यांचा वेग ११० किमी वरून १३० किमी प्रति तास पर्यंत वाढवण्यात आला, ज्यामुळे प्रवासाचा वेळ वाचणार आहे.
स्थानक पुनर्विकास: वर्षभरात १२ स्थानकांचा कायापालट करण्यात आला.
“मध्य रेल्वे आपल्या प्रवाशांना सुरक्षित आणि कार्यक्षम सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे. नवीन गाड्या, वाढीव थांबे आणि स्थानकांचा विकास यातून आम्ही प्रवाशांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत.”
— डॉ. स्वप्नील निला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.









