जळगाव तालुक्यातील वडली येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील वडली येथील शेत शिवारामध्ये काम करीत असताना शेतकरी दांपत्यावर मधमाशांच्या झुंडीने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये पतीचा मृत्यू झाला असून पत्नीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनाप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विकास चूडामण पाटील (वय ५५, रा. वडली ता. जळगाव) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. ते गावामध्ये पत्नी, दोन मुले यांच्यासह राहत होते. शेती काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते.(केसीएन)दरम्यान गुरुवार दि. १७ ऑक्टोबर रोजी जवखेडा शिवार येथे सकाळी १० ते ११ वाजेच्या दरम्यान शेतात काम करीत असताना अचानक मधमाशांच्या झुंडीने विकास पाटील आणि त्यांची पत्नी रत्नाबाई विकास पाटील (वय ५०) यांच्यावर जबर हल्ला केला.
ग्रामस्थांना कळताच त्यांनी जखमी दोघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विकास चुडामन पाटील यांना तपासून मयत घोषित केले. तर रत्नाबाई विकास पाटील यांना वार्डामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (केसीएन)घटनेची माहिती कळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेऊन माहिती जाणून घेतली. प्रगतिशील शेतकरी आणि मनमिळाऊ स्वभावाचे विकास पाटील यांच्या मृत्यूमुळे वडली गावामध्ये शोककळा पसरली असून त्यांच्या मृत्यूप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.